मुंबई- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीसाकीनाका घटनेतील निर्भयाच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. पीडितेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
साकीनाकामधील 32 वर्षीय महिलेच्या गुप्तांगावर लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत झालेल्या रक्तस्त्रावानंतर राजावाडी रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह जेजे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणला असताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पीडितेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन तिचा मृत्यू होणे, हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.