मुंबई - सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांशी फोनवर बोलताना यापुढे जपूनच बोलावे लागणार आहे. कारण, राज्य सरकारने कार्यालयात फोनवर बोलताना बेशिस्तपणाने बोलणाऱ्यांना चाप लावण्याकरिता आदेश काढले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला.
नागरिकांना छोट्या - मोठ्या कामांसाठी मंत्रालय किंवा शासन दरबारी खेटे घालावे लागतात. ही बाब विचारात घेत, नागरिकांचे हेलपाटे कमी करण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. भ्रमणध्वनी नंबर सर्वत्र जाहीर करण्यात आले आहेत. नागरिकांकडून येथे संपर्क साधल्यानंतर अपवाद वगळता अन्य अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तरे दिली जातात. परिणामी राज्य शासनाची प्रतिमा मलिन होते. दिवसेंदिवस हा प्रकार वाढू लागल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या आहेत. ही बाब विचारात घेत, अधिकारी - कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो यांनी नियमावली तयार केली आहे.
हेही वाचा-सरकार 'निर्लज्ज' होऊन शेतकऱ्यांचे ऐकत नसेल तर काय करणार, आंदोलन थांबणार नाही- राकेश टिकैत
शिष्टाचाराबाबत प्रशासकीय सुधारणा, रचना व कार्यपध्दती
अलिकडील काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा वापर अपरिहार्य बनला आहे. भ्रमणध्वनीच्या वापराबाबत काही वेळा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाही, असे निदर्शनास आले होते. अशा वर्तणुकीमुळे सरकारची प्रतिमा काही प्रमाणात मलीन होते. त्यामुळे सरकारी कामकाज करताना भ्रमणध्वनीच्या वापराबाबत पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत आदेश सचिव मालो यांनी काढले आहेत.
हेही वाचा-VIDEO वर्ध्यात वीज बिल वसुलीला गेलेल्या अभियंत्याला दुकानदारांकडून मारहाण
काय आहे निर्णयात?
- कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राथम्याने कार्यालयातील दूरध्वनीचा वापर करावा.
- कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा.
- भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.
- भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.
- कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघुसंदेशाचा शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा.
- भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी / वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.
- भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे.
- अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी, कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी silent / vibrate mode वर ठेवावा.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी तपासणे, संदेश तपासणे, ear piece / ear phone वापरणे अशा बाबी टाळाव्यात.
- कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये.
दरम्यान, मोबाईल हॅकिंगच्या प्रकरणाने देशाच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे.
काय आहे मोबाईल हॅकिंग प्रकरण -
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इस्रायली पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉटसअॅपवर पाळत ठेवल्याची माहिती 2019 मध्ये उघड झाली होती. व्हॉट्स अॅपनं यासंदर्भात एनएसओ (NSO) या कंपनीला कोर्टात खेचल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष याकडे वेधलं गेलं आहे. इस्रायलच्या NSO या इस्त्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनीने पेगासस सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपची यंत्रणा भेदून पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचे व्हॉट्सअपनं जाहीर केले. NSO या कंपनीनं मात्र त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले.