मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना रुग्णालयात, कोविड सेंटरमध्ये बेड आणि ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कोविड-केअर सेंटर सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
कोविड उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड, सॅच्युरेटेड, ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अशा कोविड उपचाराशी निगडीत सुविधा येथे उपलब्ध असतील, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
हेही वाचा-मध्य प्रदेश : कोरोना रुग्णाचा मृतदेह मागणाऱ्या नातेवाईकाला वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मारहाण
१० लाख खर्चास मंजुरी
कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या २५ टक्के रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी रुपये १० लाखापर्यंतच्या भांडवली खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले आहेत. मात्र १० लाखांच्या वरील प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार पणन संचालक, यांना दिल्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा-नांदेड : रुग्णांसह नातेवाईकांच्या मदतीला सरसावले तरुण; दररोज दोनशे डब्यांचे वाटप
ऑक्सिजन सिलिंडर, बेड सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश-
कोविड केअर सेंटर हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे. या सेंटरवरील विलगीकरण कक्षात बाजार समितीकडून ऑक्सिजन सिलिंडर, बेड सुविधा उपलब्ध करून देणे व सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशीनचा उपलब्ध कराव्यात, असे सहकार व पणन मंत्री यांनी सांगितले. तसेच सेंटरवरील विलगीकरण कक्षात येणाऱ्या रुग्णांना बाजार समितीने दोन वेळेस जेवण व नाष्टा व चहा यांची प्रामुख्याने व्यवस्था करावी. कोविड केअर सेंटर चालविताना राज्य सरकारने कोविड संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बंधनकारक राहील, असेही पाटील यांनी सांगितले.