महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई मेट्रो-1 ची वेळ झाली कमी, अत्यावश्यक सेवेतील प्रवाशीच करू शकणार प्रवास - mumbai latest news

मेट्रो 1 ची वेळ कमी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

मुंबई मेट्रो
मुंबई मेट्रो

By

Published : Apr 22, 2021, 6:28 PM IST

मुंबई -राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. आजपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. त्यानुसार मेट्रो आणि लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवार मेट्रो 1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) ची वेळ कमी करण्यात आली आहे. आता शुक्रवारपासून मेट्रो 1 सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेतच धावणार आहे. उद्यापासून मेट्रो 1 मधून केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच प्रवास करता येईल असे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने जाहीर केले आहे. मेट्रो 1च्या किती फेऱ्या कमी होणार हे उद्याच स्पष्ट होईल.

सकाळी 6.50 ते रात्री 10.15 दरम्यान धावत होती मेट्रो -

22 मार्च 2020 पासून मेट्रो 1 सेवा लॉकडाऊन आणि कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली होती. ही सेवा तब्बल सात महिने बंद होती. ऑक्टोबरमध्ये मेट्रो 1 सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिला. सुरुवातीला कमी फेऱ्याने सेवा सुरू झाली. हळूहळू वेळ आणि फेऱ्या वाढण्यात आल्या. आतापर्यंत सकळी 6.50 ला पहिली मेट्रो सुटत होती. तर रात्री 10.15 ला शेवटची मेट्रो सुटत होती. मेट्रोच्या 150 फेऱ्या रोज होत होत्या आणि दिवसाला सरासरी 50 हजार प्रवाशी प्रवास करत होते. पण आता मुंबईत कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. त्यामुळे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मेट्रो सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता एमएमओपीएलने मेट्रो 1 ची वेळ कमी केली आहे. त्यानुसार आता शुक्रवारपासून सकाळी 7 ला पहिली तर रात्री 9ला शेवटची मेट्रो सुटणार आहे.

आयकार्ड असेल तरच एन्ट्री -

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशासाठीच आता मेट्रो 1 ची सेवा असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेचे अधिकृत आयकार्ड असेल तरच मेट्रो 1मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक स्थानकावरील सर्व प्रवेशद्वारावर डेस्क असणार आहेत. तर या डेस्कवर तापणसी करून मग प्रवेश दिला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details