मुंबई - राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका मागील दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. पण आता मोठ्या 250पेक्षा जास्त सभासद असलेल्या संस्थाच्या निवडणुका आता मार्गी लागणार आहेत. कारण राज्य सरकारने निवडणुकावर आणलेली स्थगिती मागे घेतली असून या सोसायट्याची नियमावली जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. पण 250पेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायट्याच्या निवडणुकीची नियमावली अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे या छोट्या सोसायट्यांच्या निवडणुका रखडलेल्याच असून यामुळे गृहनिर्माण संस्था तसेच सभासदांमध्ये नाराजी आहे.
मागील दोन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या
सर्व प्रकारच्या सहकारी संस्थाच्या दर पाच वर्षांनी निवडणूका होतात. या निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या असतात. पण मागील दोन वर्षापासून राज्यात सहकारी संस्थाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. विविध कारणांनी या निवडणुका रखडल्या होत्या, त्यात सरकारने 31 मार्चपर्यंत निवडणुकाना स्थगिती दिली होती. पण आज मात्र सरकारने ही स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या सहकारी संस्थाच्या निवडणुका मार्गी लागणार आहेत.