मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी २१ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ आणि माहीमदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि गंतव्यस्थानी त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर या सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानी त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.