मुंबई - भाजपमध्ये मागील वर्षभरापासून नाराज असलेल्या आणि पक्षाच्या एकूणच कामकाज आणि व्यवस्थेशी उबगलेले तब्बल डझनभर भाजप आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
कधीही होऊ शकतो राष्ट्रवादीत प्रवेश -
जयंत पाटील म्हणाले की, दोन्ही हाताच्या बोटावर मोजता येणार नाहीत इतके विधानसभा सदस्य हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. हे सर्व सदस्य भाजपामध्ये नाराज असून त्यांना पक्षाच्या व्यवस्थेचा उबग आलेला आहे. त्यातील बरेच जण आमच्यासोबत मोकळेपणाने बोलत असतात. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश कधीही होऊ शकतो, असेही जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
जयंत पाटील पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपच्या विद्यमान आमदारांचाही होणार राष्ट्रवादीत प्रवेश -
आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हातकणंगले येथील माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. या प्रवेशासोबतच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांचा प्रवेश झाला असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपच्या विद्यमान आमदारांचाही प्रवेश होईल, अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.