मुंबई - विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज (सोमवार) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात सर्वच पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात काही लढती या अत्यंत तुल्यबळ मानल्या जात आहेत. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज या सर्वांचे राजकीय भविष्य मतपेटीत बंद होणार आहे.
यावेळी ३ हजार २३९ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. भाजप सेना युती जरी असली तरी अनेक ठिकाणी या युतीला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. तर काँग्रेसच्या वतीने फारसे कोणी प्रचारात उतरताना दिसले नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यावेळी राज्यात जोरदार प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.
या लढतींकडे सर्वांचे लक्ष...
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील लढत ही महत्वाची मानली जात आहे. या मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आशिष देशमुख निवडणूक लढवत आहेत.
वरळी विधानसभा
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून आपले भविष्य आजमावत आहेत. त्यांच्या रुपाने ठाकरे घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादील काँग्रेसने सुरेश मानेंना उमेदवारी दिली आहे. तर बीग बॉस फ्रेम अभिजीत बिचकुलेही या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
बारामती विधानसभा
बारामती विधानसभा मतदारसंघआतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार हे तर त्यांच्या विरोधात भाजपने गोपीचंद पडळकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
भोकर विधानसभा
भोकर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपचे बापूसाहेब गोरठेकर हे निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या पराभव झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाण यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
संगमनेर विधानसभा
संगमनेर विधानसभा मतदारससंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात रावसाहेब नवले यांना शिवसेनेने मैदानात उतरवले आहे.
परळी विधानसभा
परळी विधानसभेची लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात आहे. कारण येथे मुंडे बहिण भावात लढत होत आहे. विधानपरिषदेचे विरोधा पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात मंत्री पंकजा मुंडे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बीड विधानसभा
बीड विधानसभा मतदारसंघातील लढत ही काका-पुतण्यात होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर हे निवडणूक लढवत आहेत.
कर्जत जामखेड विधानसभा
या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहीत पवार निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपचे मंत्री राम शिंदे निवडणूक लढवत आहेत. रोहीत पवार यांनी राम शिंदेपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.
शिर्डी विधानसभा
शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात सुरेश थोरात हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.
सोलापूर शहर मध्य विधानसभा
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात नुकतेच काँग्केसमधून शिवसेनेत गेलेले दिलिप माने हे निवडणूक लढवत आहेत.
लातूर ग्रामीण विधानसभा
लातूर ग्रामीण मतदारसंघातून दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख हे प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेने सचिन देशमुखांना मैदानात उतरवले आहे.
कराड दक्षिण विधानसभा
या मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपकडून अतुल भोसले हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.