मुंबई - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद होणार नाही. संस्थेची स्वायत्तता कायम राहील. ‘सारथी’ला उद्याच तातडीने 8 कोटींचा निधी दिला जाईल. समाजबांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन 2020-30’ हा दहा वर्षाचा आराखडा तयार केला जाईल. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील, अशा अनेक घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या. ‘सारथी’च्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचे सांगून यापुढच्या काळात ‘सारथी’वरचे हेत्वारोप टाळून बदनामी थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरुवार) मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला इतर मागासवर्गीय विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार विनायक मेटे आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी विचार मांडले. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.
हेही वाचा -सारथी..! मराठा समाजातील प्रतिनिधी सोबतच्या बैठकीचा पहिला टप्पा पूर्ण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, की ‘सारथी’संस्थेसंदर्भात विविध व्यक्ती, संस्था, मान्यवरांकडून आलेली निवेदने, पत्रे, मागण्यांची नोंद घेण्यात आली आहे, त्यांचा एकत्रित विचार करून सर्वांच्या मनासारखा सकारात्मक निर्णय व्हावा, ही सरकारची भूमिका आहे. त्याअनुषंगाने मराठा समाजाच्या विविध विद्याशाखा, अभ्यासक्रमात शिकणाऱ्या, स्पर्धापरिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क त्वरीत मिळावे यासाठी उद्याच 8 कोटी रुपये ‘सारथी’ला उपलब्ध करुन दिले जातील. ‘तारादूत’ यांना दोन महिन्यांचा प्रलंबित निधी तात्काळ दिला जाईल.