मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मुख्यमंत्र्यानी घोषित केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबाजवणी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांची महत्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते अजित पवार तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री यांच्या सोबत सेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि इतर नेते उपस्थित आहेत. हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराला गती आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू झाली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार आणि शेतकरी कर्जमाफीसाठी सह्याद्रीवर बैठक सुरू हेही वाचा -'आयएमसी इंडिया'कडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख
बैठकीपूर्वी सिल्वर ओक बंगल्यावर शरद पवार यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्याकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठीची यादी तयार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे शिवसेनेनेही जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांची व इतर नेत्यांची चाचपणी करून त्यासाठीची एक यादी तयार केली असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात काँग्रेसने आपल्या हालचाली वेगात सुरू केल्या असून कालपासून दिल्लीमध्ये काँग्रेसचे अनेक बडे नेते तळ ठोकून बसले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत काँग्रेसच्या मंत्रिमंडळाची यादी अंतिम होण्याची शक्यता असल्याने सह्याद्री अतिथीगृहावर सुरू असलेली ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा -समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न झारखंडच्या जनतेने नाकारला - शरद पवार
हिवाळी अधिवेशनात सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यासाठीची अंमलबजावणी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना नव्याने करता येतील यावर या बैठकीत चर्चा केली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.