महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांची कोविड उपाययोजनांसाठी सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक

मुख्यमंत्री कोविड उपाययोजनांसंदर्भात सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सायंकाळी साडेचार वाजता वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक घेणार आहेत. या बैठकीला आरोग्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरसद्वारे उपास्थित असणार आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

By

Published : Apr 2, 2021, 12:01 PM IST

Updated : Apr 2, 2021, 1:38 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री कोविड उपाययोजनांसंदर्भात सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सायंकाळी साडेचार वाजता वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक घेणार आहेत. या बैठकीला आरोग्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरसद्वारे उपास्थित असणार आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा उच्चांक गाठला जात आहे. ही राज्य सरकारसाठी चिंतेची बाब आहे. आतापर्यंत सरकारकडून निर्बंध कडक केले जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तर परिस्थिती भयाण होत राहिल्यास लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असेही ही वेळोवेळी सांगण्यात आले आहे.आजच्या या महत्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

लोकल, बस प्रवासावर येणार निर्बंध
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वाढत्या संक्रमणामुळे चिंतेची परिस्थिती उद्भवली आहे.नागरिकांकडून शासनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा लोकल, बस प्रवासावर निर्बंध लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या रविवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही नियमावली लागू करण्याची शक्यता आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा -ड्रग्ज प्रकरण: अभिनेता अर्जुन रामपाल साऊथ आफ्रिकेला पळून जाण्याच्या तयारीत होता- एनसीबी


लॉकडाऊन परवडणार नाही
देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. दर दिवशी वाढणाऱ्या नव्या रुग्ण संख्येने सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. केंद्रशासित प्रदेशातील ४६ जिल्ह्यांमध्ये जवळपास ७१ टक्के रुग्ण आहेत. तर ६९ टक्के मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे.वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा पर्याय टास्क फोर्स समितीने सुचवला आहे. मात्र, लॉकडाऊन राज्याला परवडणारा नाही, नोकरी- धंदे जातील. अर्थ व्यवस्था कोलमडून पडेल, असे सूर सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पक्षातूनही उमटत आहेत.

गर्दीच्या ठिकाणावर निर्बंध
लॉकडाऊन टाळायचा असल्यास मास्क घालावा, हात धुवावे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने करत आहेत.परंतु, नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही. परिणामी रुग्ण वाढत असल्याने बेड, व्हेंटिलेटर, आरोग्य सुविधांची कमतरता निर्माण होईल, अशी भीती टास्क फोर्सने वर्तवली आहे. त्यामुळे गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे.

हेही वाचा -नवी नियमावली : होम क्वारंटाईनमध्येही मास्क, ग्लोज घालणे बंधनकारक


लोकल, बस साठी विशेष मार्गदर्शक सूचना
मल्टिप्लेक्स, सिनेमा हॉल, बीच, गार्डन्स, सभागृह आणि मॉल्सना ठराविक कालावधीसाठी मंजुरी दिली.आता ही ठिकाणेही काही कालावधीसाठी २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दुकाने, बाजारपेठ, फेरीवाल्यांकरिता मार्गदर्शक सूचना लागू केल्या जातील. तसेच मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या लोकल आणि बस प्रवासावर निर्बंध घातले जाणार आहेत. तसेच उपनगरी लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सार्वजनिक परिवहन बसेस करिता कठोर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील. रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर कोविड चाचणी अधिक तीव्र करण्याबाबतच्या उपाययोजना राज्य सरकार आखत आहे. उद्योगधंदे, सेक्टर हाऊसना पूर्ण क्षमतेने काम करण्यास अनुमती दिली जाईल. मात्र, त्यासाठी कोरोना चाचणी आणि नियमावलीचे पालन करणे सक्तीचे असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Last Updated : Apr 2, 2021, 1:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details