नवी दिल्ली - सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांकडून महिन्याला पोलिसांना १०० कोटींची खंडणी वसुलीचे टार्गेट दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारकडून डॅमेज कंट्रोलची जबाबदारी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी उचलली आहे.
या प्रकरणी शरद पवारांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक बोलाविली आहे. यामध्ये पुढील रणनितीवर चर्चा केली जाईल. शरद पवारांच्या 6, जनपथ येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि एनसीपीचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक सुरू आहे.
परमबीरसिंग यांच्या आरोपानंतर राज्यातील परिस्थितीबाबत यापूर्वी शरद पवार यांनी शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्याशी चर्चा केली आहे.