मुंबई -मराठा समाजातील तरुणांची शासकीय सेवेत निवड झाली होती. त्या तरुणांना नोकर्या देण्याबाबत, तसेच ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे असे दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. तसेच राजकीय हेतू साध्य करण्यासाठी विनायक मेटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.
राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजातील तरुणांची शासकीय सेवेत निवड झाली होती. त्या तरुणांना नोकर्या देण्याबाबत, तसेच ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे असे दोन महत्त्वाचे मुद्द्यांवर आज मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया आहे. ती सचिवांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण करून लवकरात लवकर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत समोर आणून त्या तरुणांना न्याय दिला जाईल अशी माहिती मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. अकरा ते बारा विभागांमध्ये या नियुक्त्या खोळंबल्या आहेत. याबाबतची माहिती एक आठवड्याभरात जमा करण्याचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारकडून न्यायालयीन लढाईसाठी तयारी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना मराठा आरक्षणाबाबत लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. मात्र या यासोबतच राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करावी लागली. तर, नेमके कोणकोणते मुद्दे त्यामध्ये असावे याबाबतची चर्चा मराठा उपसमिती कडून सुरू झाली आहे. याबाबत आज मराठा उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे उपस्थित होते.