मुंबई -तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्राच्या ( KCR Visit To Maharashtra ) दौऱ्यावर येणार असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांची भेट घेण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे प्रादेशिक अस्मिता वाचवण्याचा ( Preserve Identity of Regional Parties ) आणि एकसंघ होऊन मोदींना शह देण्याचा प्रयत्न असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असले तरी गेल्या दीड वर्षांपासून त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा आणि इच्छा स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ नरेंद्र मोदी यांना अटक करण्यासाठी ते पुढे आले आहेत. यामागे नरेंद्र मोदी यांचा विरोध हे मुख्य कारण असले तरी स्वतःचा प्रादेशिक पक्ष आणि अस्मिता वाचवण्यासाठी हा सर्व खटाटोप लहान पक्षांनी सुरू केला असल्याची चर्चा आहे.
मोदींचा राष्ट्रीय स्तरावर विरोध -
या संदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर म्हणाले की, केसीआर हे मूळचे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी युथ काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी काम केले आहे. त्यांच्याबरोबर चंद्राबाबू नायडू हेसुद्धा होते. मात्र, या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि अस्मिता जपण्यासाठी वेगळ्या वाटा निवडल्या दोघांचाही त्या दिशेने प्रवास सुरू झाला. चंद्राबाबूनी तेलुगु देसमच्या माध्यमातून सत्ता मिळवली होती, तर आपल्याला सत्ता मिळवायची असेल, तर तेलंगणा राज्याची अस्मिता जोपासली पाहिजे, हे केसीआर यांच्या लक्षात आले. तुलनेने मध्यमवयीन असलेल्या केसीआर यांनी ही राजकीय चळवळ तेलंगणात सुरू केली आणि वाढवत नेली. त्यामुळे त्यांचे नेतृत्व पुढे आले. या आंदोलनात सुमारे हजार लोक मारले गेले. मात्र, काँग्रेसची असलेले जुने संबंध आणि संपर्क यांची सांगड घालत केसीआर यांनी सोनिया गांधींशी संपर्क साधला. स्वतंत्र तेलंगणा राज्य दिल्यास तुमच्यासोबत राहू असे, आश्वासन त्यांनी काँग्रेसला दिले. त्यांच्या या प्रस्तावाला 2014मध्ये यश आले. तेलंगणा राज्य वेगळं केलं तर भविष्यात आपल्याला उपयोग होईल म्हणून काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या विभाजनाला मान्यता दिली. या पट्ट्यात वायएसआर हे काँग्रेसच्या बाजूने होते. मात्र, ते गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी केसीरच्या मदतीने भरून निघेल, असे काँग्रेसला वाटले. मात्र, 2014 मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि नरेंद्र मोदी सत्तेत आले. मोदी सत्तेत आल्यानंतर सर्व समीकरणे बदलली काँग्रेस सोबत राहू, असं आश्वासन दिलेले चंद्रा-बाबू आणि केसीआर सुद्धा भाजपकडे सरकले.
'प्रादेशिक पक्षांनी अस्मिता टिकवण्यासाठी लढावे' -