मुंबई -20 जुलैला होणार्या विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत ( Legislative Council elections ) रणनीती तयार करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. अर्धा तास या तीनही नेत्यांमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली.
विधानसभा निवडणुकीत खबरदारी - राज्यसभा निवडणुकीदरम्यान अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात केलेल्या मतदानामुळे चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला होता. याची पुनरावृत्ती विधान परिषदेच्या निवडणुकीत व्हायला नको यासाठी या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. तसेच उद्या 18 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांना मुंबईत हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. या बाबतच्या नियोजनाची देखील चर्चा या बैठकीत झाली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चा सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी घेतली जाणारी खबरदारीबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याचे बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.