मुंबई -राज्यात सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यासाठीच मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार होती. मात्र, ही नियोजीत बैठकही रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र, ही रद्द झालेली बैठक उद्या होणार असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... पवारांचा यू टर्न..? आता म्हणतात ५४ आमदारांवर सरकार कसे बनवणार, सेनेची कोंडी
आज मंगळवारी 19 नोव्हेंबरला भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आहे. काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, जयंतीनिमित्त होत असलेल्या अनेक कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यामुळे मंगळवारी उभय पक्षांच्या नेत्यांची होणारी बैठक रद्द करण्यात आली असून ती उद्या म्हणजे बुधवारी होईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. एकीकडे शिवसेना नेत्यांकडून सरकार स्थापनेबाबत सातत्याने विश्वास दाखवला जात आहे, तर दुसरीकडे आघाडीकडून मात्र कोणताही निर्णय होताना दिसत नाही. राज्यातील हा सरकार स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोणत्याही प्रकारची घाई होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील सरकार स्थापनेला होत असलेला विलंब अजून वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा... शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक संपन्न; काय ठरले याबाबत उत्सुकता