मुंबई- कोरोना रुग्णांची मुंबईत संख्या कमी होत असली तरी राज्यात मात्र अजुनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दिवसाला 67 हजार रुग्ण आजही आढळत आहेत. यातील 10 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यात दिवसाला 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील (एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे. आधीच राज्यात 300 मेट्रिक टनची टंचाई असताना आठवड्याभरात मागणी आणखी 300 मेट्रिक टनने वाढली आहे.
राज्यातील वाढत्या ऑक्सिजनची गरज कशी पूर्ण करायची हा प्रश्न राज्य सरकार आणि एफडीएसमोर उभा ठाकला आहे. परराज्यातून ऑक्सिजन मागवण्यासह अन्य कोणकोणत्या माध्यमातून ऑक्सिजनचा साठा वाढवता येईल यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत'ला सांगितले आहे.
एका रुग्णाला दिवसाला लागतो सरासरी 12 लिटर ऑक्सिजन
पहिली लाट ओसरून राज्यातील कॊरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली होती. पण मार्चपासून राज्यात दुसरी लाट, डबल म्युटंट, ट्रिपल म्युटंट आल्याने पुन्हा कोरोनाचा हाहाकार सुरू झाला. दिवसाला 2500 वरून आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा आज 67 हजारांवर गेला आहे. पहिल्या लाटेत 500 ते 850 मेट्रिक टन ऑक्सिजन दिवसाला लागत होता. पण दुसऱ्या लाटेत 62 ते 67 हजार रुग्ण दिवसाला आढळत आहेत. तर सक्रिय रुग्ण अंदाजे 7 लाख आहेत. यातील 10 टक्के रुग्णांना आज ऑक्सिजनची गरज लागत आहे. त्यामुळे आज केवळ आणि केवळ कोविडसाठी (पॉझिटिव्ह रुग्ण) 1570 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. तर संशियत कोरोना रुग्ण आणि इतर अर्थात नॉन कोविड रुग्ण यांना 230 मेट्रिक टन असा एकूण 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. दरम्यान एका रुग्णाला सरासरी दिवसाला 12 लिटर ऑक्सिजन लागत आहे.
हेही वाचा-'साहेब, पाया पडतो. एक तरी ऑक्सिजन बेड द्या.. ' नाशिक हेल्पलाईनवर येताहेत शेकडो फोन
600 मेट्रिक टनचा तुटवडा
राज्यात दिवसाला 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. कोविडच्या आधी वैद्यकीय वापरासाठी 350 ते 400 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होते. पण कोरोना काळात वैद्यकीय वापराची ऑक्सिजनची गरज थेट 850 मेट्रिक टनवर गेली. तर आता दुसऱ्या लाटेत आज ही मागणी थेट 1800 मेट्रिक टनवर गेली आहे. असे असताना राज्यात 600 मेट्रिक टनचा तुटवडा आहे. दरम्यान कोविडच्या आधी 60 टक्के वैद्यकीय वापरासाठी तर 40 टक्के औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन वापरला जात होता. पण कोविड काळापासून सर्वच्या सर्व 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी, कोविडसाठी वापरला जात आहे. पण मुळात मागणी आता 1800 मेट्रिक टनची असल्याने 600 मेट्रीक टनचा तुटवडा आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हेही वाचा-राज्यातील काही जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन तर काही जिल्ह्यात जाणवतोय तुटवडा
युद्धपातळीवर प्रयत्न सुरू-
राज्यात ऑक्सिजनच्या उपलब्धतेची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. 600 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा कसा करायचा. त्यात देशभरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आमच्या पुढचा हा प्रश्न आणखी गंभीर आणि चिंताजनक झाल्याची कबुली या अधिकाऱ्याने दिली आहे. आजही ऑक्सिजन अभावी रुग्ण तडफडून मरत आहेत. राज्यात रुग्ण ऑक्सिजन विना मरू नये, यासाठी आम्ही आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अतिरिक्त 500 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल यादृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत.
'यांना' घातले जातेय साकडं
सध्या गुजरात, छत्तीसगढ आणि तेलंगणा येथून 200 मेट्रिक टन ऑक्सिजन आणण्यात येत आहे. तर छोट्या उत्पादकांनाही साकडे घालत निर्मिती वाढवण्यास सांगितले आहे. त्याचवेळी इतर काही राज्यांनाही ऑक्सिजन मागितले आहे. पण त्या राज्यातही ऑक्सिजनची टंचाई आता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून किती ऑक्सिजन मिळेल वा मिळेल का हा प्रश्न आहे. दरम्यान स्टील उत्पादक कंपन्याना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लागते. त्यांच्या प्रत्येक कारखान्यात ऑक्सिजन प्लांट असतो. तेव्हा आता त्यांना साकडे घालत ऑक्सिजन देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर बंद प्लांटही सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून राज्याला केवळ 105 मेट्रिक ऑक्सिजन उपलब्ध झाला होता. दिवसाला 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असताना 105 मेट्रिक टनने काय होणार , असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एकूणच ऑक्सिजनच्या उपलब्धतेची परिस्थिती आणीबाणीसारखी आहे, हे स्पष्ट होत आहे.