मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण साजरे करताना ऑनलाइन पद्धतीने साजरे करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत मुंबईच्या महापौरांनी ऑनलाइन भाऊबीज साजरी केली आहे. यावेळी भाऊबिजेची ओवाळणी म्हणून मिळालेली रक्कम महापौर निधीत जमा करण्यात आली आहे. मुंबईकरांनीही घराबाहेर न पडता घरात राहून सण साजरा करावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
ऑनलाइन सण - आवाहन
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू केले जात आहेत. या दरम्यान वाहतूक, बाजारपेठ आदी ठिकाणी गर्दी वाढून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घरात राहून सण साजरे करावे. तसेच एकमेकांना शुभेच्छा देताना त्याही ऑनलाइन पद्धतीने देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.
भाऊबीज महापौर निधीत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर घरात राहून नियमांचे पालन करत दणक्यात दिवाळी सण साजरा करण्याचे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले होते. मुंबईकरांना आवाहन केल्यावर खुद्द महापौरांनी भाऊबीज हा सण ऑनलाइन साजरा केला आहे. महापौरांनी २१ भावांना ओवाळले असून या भावांनी दिलेली भाऊबीज महापौर निधीत जमा केली आहे.
"देवदूत भाऊ"
वांद्रे येथील बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश ढेरे हे "भाऊबीज" कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होते. कोरोना काळात मुंबईकर नागरिकांची सेवा करता येणे हे माझे भाग्य असून याकाळात मुंबईचे रक्षणकर्ते म्हणून डॉक्टर, परिचारका व कक्ष परिचर यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. त्यातील प्रातिनिधिक डॉक्टरांना आज मला "देवदूत भाऊ" म्हणून औक्षण करण्याची संधी मिळाली. याचा मला सार्थ अभिमान असल्याचे महापौर म्हणाल्या. कोरोनाच्या काळामध्ये माझा एक भाऊ कोरोनामुळे गमावला असून मुंबईतील सर्वच भावांची मला खूप मदत झाली असून त्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील २१ भावांना मी आज ओवाळले आहे. सर्व मुंबईकर नागरिकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत नागरिकांनी कोरोना काळातील सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपला उत्सव घरच्या घरी साजरा करावा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी यानिमित्ताने केले आहे.