मुंबई -महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत पेडणेकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून माहिती दिली आहे.
पेडणेकर यांनी अॅन्टिजेन चाचणी करून घेतली. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांनी स्वत:ला घरातच क्वारन्टाइन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी म्हटले. डॉक्टरांच्या सल्ल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन पेडणेकरांनी केले आहे. घरातील अन्य सदस्यांची देखील चाचणी केल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच मुंबईकरांना रुग्णालयात सोयी सुविधा उलब्ध करून देण्यासाठी किशोरी पेडणेकर सतत कार्यरत होत्या. सतत बैठका घेऊन नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सर्व रुग्णालयांना त्यांनी भेटी दिल्या. कोरोनाची लागण होण्याची भीती असली तरी, अनेकवेळा पीपीई कीट घालून महापौरांनी आयसीयू आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधला होता.
मुंबईत एप्रिल महिन्यात 53 पत्रकार पॉझिटिव्ह आल्यानंतर तेव्हा महापौरांनी कोरोना टेस्ट केली होती. यानंतर त्यांना स्टोनचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दोन्ही वेळा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, तिसऱ्या वेळी महापौरांनी अँटीजेन टेस्ट केल्यानंतर आता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्यांनी महापौर बंगल्यात स्वतःला क्वारंटाइन केले. दरम्यान महापौर बंगल्यावरील 40 कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली आहे. मात्र सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.