मुंबई- कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. या प्रकरणातनंतर मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेल्या बोगस लसीकरणाची प्रकरणे समोर आली आहेत. तपासात आरोपींनी २५ मे ते ६ जून दरम्यान १० शिबिरांचे आयोजन केले गेले होते. या दरम्यान २६०० लोकांना बोगस लस देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी कारवाई करत मुंबई महानगर पालिकेने शिवम रुग्णालय सील केले आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोगस लसीकरण नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक असून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या रुग्णालयांना चाप बसला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.
कोरोना काळात लोकांना त्रास होतोय, हे माहीत आहे पण नाईलाजाने निर्बंध ठेवावे लागत आहेत, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मुंबईत लसीकरण वेग घेत आहे. मात्र, लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात झाला तर लसीकरणाचा वेग अधिक वाढेल, असे त्यांनी म्हटलंय. खासगी लसीकरण केंद्रावर पालिकेचे लक्ष असून बोगस लसीकरण झाल्याने नागरिक पालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.