मुंबई -कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असल्याने राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नुकतेच केईएम मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसचे शिक्षण घेणारे विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पालकांनी संमती दिली तरच विद्यार्थ्यांना शाळेत घेतले जाईल, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
'पालकांची संमती घेणार'
राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढून मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत. त्याबाबत महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, मुंबईत 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. ८ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू होतील. पालकांची संमती घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत घेतले जाईल. शाळा समितीकडे पालकांनी संपर्क करावा. पालकांना विनंती आहे, शाळा सुरू होत आहेत तुमची परवानगी असेल तर प्रवेश मिळेल. एका बेंचवर एक विद्यार्थी असेल. मास्क पालिकेकडून पुरवले जाईल. कोरोना नियमाचे पालन केले पाहिजे, असेही यावेळी महापौरांनी सांगितले.
केईएम मेडिकल कॉलेजमध्ये २९ विद्यार्थी पॉझिटिव्ह
मुंबईच्या केईएम रुग्णालय व सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कॉलेजमध्ये राहत नसलेल्या आणखी ७ जणांना कोरोना झाल्याने हा आकडा २९ वर गेला आहे. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातील हे विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. मागील दोन तीन दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झाली. क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता आहे. काही विद्यार्थ्यांना सेव्हन हिलला दाखल केल आहे, असे महापौरांनी सांगितले आहे. मुंबईमध्ये आजही कोरोना संपला नाही. म्हणून मास्क घालणे गरजेचे आहे. शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू करत असताना काळजी घेतली जाईल, असे महापौरांनी सांगितले. जे कोणी डंका पिटवत होते त्यांना आता विचारा, असा टोला त्यांनी भाजपाचे नाव न घेता लगावला आहे.
हेही वाचा -पोस्टिंग, ट्रान्स्फरबाबत होणार चौकशी? अनिल देशमुख प्रकरणी राज्य गृह विभाग उपसचिवाला ईडीची नोटीस