मुंबई -बोरिवली येथील भाजपा नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात एका महिलेला पद देतो सांगून छेडछाड करण्यात आली आहे. तसेच या महिलेला मारहाणही करण्यात आली आहे. यावर आता भाजपा गप्प का, भाजपच्या स्टंटबाजी करणाऱ्या ताई कुठे गेल्या? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -संयुक्त किसान मोर्चाची 27 सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक, भाजप वगळता सर्व पक्षांचा बंदला पाठिंबा
- आता त्या महिला कुठे आहेत -
मुंबईच्या बोरिवली येथील भाजपच्या नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात एका महिलेला पद देतो असे सांगून छेडछाड करण्यात आली आहे. हा प्रकार त्या महिलेने स्थानिक खासदार व आमदारांना पत्र लिहून कळवला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्या महिलेला नगरसेविकेच्या कार्यालयात बोलावून मारहाणही करण्यात आली आहे. यावर महापौर बोलत होत्या. इतर ठिकाणी महिलांबाबत काही घटना घडल्यास भाजपच्या महिला नेत्या, कार्यकर्त्या खोटं रडून दाखवता, महाराष्ट्राला बदनाम करतात. आता त्या कुठे आहेत? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. भाजपाचे सरकार असलेल्या राज्यातही महिलांवर अत्याचार होतात. त्यावेळीही भाजपच्या महिला कार्यकर्त्या गप्प बसलेल्या असतात, असा टोला महापौरांनी लगावला आहे.