मुंबई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या (६ डिसेंबर) ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. चैत्यभूमीवर फक्त शासकीय कार्यक्रम होणार आहेत. कोविडचा काळ असल्याने कोणालाही अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांसह महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी देखील त्याला दुजोरा देत गर्दी टाळण्याचे आवाहन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी येथे २५ लाखांहून अधिक भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. १ ते ७ डिसेंबर दरम्यान दादर परिसरात पाय ठेवायला जागा नसते. लाखो लोकांची गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ते रोखण्यासाठी भीम अनुयायांनी सहकार्य करावे. यासाठी मुख्यमंत्री, महापौर, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.
गर्दी करू नका
कोरोना संकटामुळे यावर्षी जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन महापौरांनी केले. त्यासोबतच कोरोनामुळे अनुयायांसाठी निवास व्यवस्था करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेय चैत्यभूमी येथे दरवर्षी ज्या पद्धतीने सजावट करण्यात येते ती सजावट करण्यात आली आहे. यामध्ये चैत्यभूमी वास्तूची तसेच अशोक स्तंभ व तोरणा गेटची साफसफाई व रंगरंगोटी करणे, चैत्यभूमी व अशोक स्तंभाची फुलांनी सजावट करणे, भीमज्योतीची फुलांनी सजावट करणे, तसेच चैत्यभूमी व आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करणे व किटकनाशक औषधांची फवारणी करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेचे व अभिवादनांसाठी ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येणार असून चैत्यभूमी येथे १ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका व चार बोटी तसेच जल सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांचेही आवाहन
महापरिनिर्वाण दिन हा बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.