मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. यंदा नालेसफाई दरम्यान मे अखेरपर्यंत मोठया नाल्यांमधून ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मात्र ३ लाख २४ हजार २८४ मेट्रिक टन इतका म्हणजे १२ हजार ९०३ मेट्रिक टन म्हणजेच १०४ टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
मुंबईत १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा महापौरांचा दावा विरोधकांचा आरोप -
मुंबई महापालिकेकडून नालेसफाई केल्यावर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी नालेसफाईची पाहणी केली. त्यात नाले सफाई झाली नसल्याची पोल खोल करण्यात आली. त्यानंतर
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी काल सोमवारी नालेसफाई कामांची पाहणी केली. नालेसफाई नीटपणे न करता हात की सफाई केल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली आहे. कंत्राटदारांकडून पैसे वसुलीचे काम वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना देण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.
१०४ टक्के नाले सफाई -
विरोधकांकडून टीका होत असल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी नालेसफाईबाबत आज बैठक बोलावली. या बैठकीत महापौरांनी नालेसफाईचा आढावा घेतला. यावेळी विरोधकांचा आरोप महापौरांनी फेटाळून लावत प्रमाणापेक्षाही जास्त म्हणजे १०० टक्के ऐवजी १०४ टक्के गाळ काढला असल्याचा दावा केला आहे. यावरून पालिका सभागृह आणि स्थायी समितीच्या बैठकीत याचे पडसाद उमटेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
११ हजार फेऱ्यांमधून गाळ टाकला -
वर्षभरात प्रमुख नाल्यांमधून सुमारे ४ लाख १३ हजार ९८७ मेट्रिक टन गाळ काढण्याचे ठरविण्यात आले आहे. पैकी, पावसाळापूर्व ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. ३१ मे अखेरीसपर्यंत एकूण ३ लाख २४ हजार २८४ इतका गाळ पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून काढण्यात आला आहे. यामध्ये, शहर भागात ४३ हजार ७६६ मेट्रिक टन, पूर्व उपनगरात १ लाख ६ हजार २६० मेट्रिक टन, पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ८२ हजार २८५ मेट्रिक टन एवढा गाळ काढण्यात आला असून एकूण ११ हजार ४ इतक्या वाहनफेऱ्या करुन हा गाळ वाहून नेण्यात आला आहे, असा दावा महापौरांनी केला आहे.
अधिकाधिक नाले स्वच्छ -
तसेच, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १७ हजार २९७ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी अधिकाधिक नाले स्वच्छता करुन महापालिकेने समाधानकारकरित्या कार्यवाही पूर्ण केली आहे. नाल्यांमधून अधिकाधिक गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत मिळते, असे महापौरांनी म्हटले आहे.