मुंबई-राज्यात भाजपाकडून मागील काही दिवसांत सर्व मंदिरे उघडण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, राज्यात 23 मार्च पासून बंद करण्यात आलेल्या मशिदी उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी मुंबईतील मौलाना यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. ही परवानगी मिळाली तर आम्ही कोरोनासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करू असा, विश्वास देखील या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
मशिदी उघडण्यासाठी मौलानांची मागणी दक्षिण मुंबईतील मशिदीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन निवेदन दिले तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची भेट घेतली. निवेदन देऊन राज्यात टाळेबंदीच्या काळात बंद करण्यात आलेल्या मशिदी उघडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती या शिष्टमंडळाचे प्रमुख माजी आमदार बशीर मुसा पटेल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
तसेच राज्यातील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे 23 मार्चपासून बंद आहेत. त्याप्रमाणे मशिदीही बंद आहेत. गेले सात महिने लोकांना सामूहिक प्रार्थना करता येत नाही, त्यामुळे लोक व्याकूळ आहेत असेही पटेल म्हणाले. मौलाना हाजी मोहम्मद युसुफ अन्सारी म्हणाले की, मशिदीमध्ये दैनंदिन पाच वेळा सामूहिक प्रार्थनाक केली जाते. मात्र सध्या मशिदी बंद आहेत. मुस्लिम समाजाचे बहुतेक मुख्य सण रमजान, मोहरम, ईद उल फित्र आदी टाळेबंदिच्या काळात होऊन गेले. त्यामुळे मशिदीमध्ये सामूहिक प्रार्थना करता आलेली नाही.
या शिष्टमंडळाने राज्यात मागील सात महिन्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या महाविकास आघाडी सरकारचे कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनाचे कौतुक केले. सरकारने वेळेचे गणित जुळवून योग्य पावले उचलली. योग्य नियोजन केले म्हणून राज्यातील कोरोना आटोक्यात राहिला, असे सांगत या शिष्टमंडळाने सरकारचे कौतुक केले.
आम्ही कोरोनाच्या नियमांचे पालन करू
सरकारने आम्हाला मशिदी उघडण्यास परवानगी दिली तर आम्ही क्षमतेच्या 30 टक्के मध्ये चालवण्यास तयार आहोत. तसेच सरकारने घालून दिलेल्या कार्यपद्धतीचे आम्ही तंतोतंत पालन करू. मशिदीमध्ये नमाज अदा करण्यापूर्वी वजू म्हणजेच हात-पाय व चेहऱ्याची स्वच्छता केली जाते. त्यामुळे कोरोना संसर्गाला अटकाव होईल. तसेच सामाजिक अंतराच्या नियमाचे आम्ही नमाजावेळी पालन करू, असे शिष्टमंडळातील मौलाना सरफराज सय्यद यांनी सांगितले.