मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात भाजपने सातव्या जागेचा अर्ज भरल्याने या निवडणुकीचे सस्पेन्स वाढला आहे. सर्वच पक्षांनी आपले आमदार फुटू नयेत म्हणून जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीची सर्व मदार अपक्ष आमदारांवर आहे. अपक्ष आमदारांच मत कोणाला मिळणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल. या सर्व मतदानावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून 'आमची सर्व गणित ठरलेली आहेत. विजय आमचाच होईल.'( Victory will be ours ) असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
सर्व ठरल्याप्रमाणे होईल - राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडीचे चारही उमेदवार हे पहिल्याच फेरीत निवडून (Mahavikas Aghadi were elected ) येतील. दोन शिवसेनेचे, एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक काँग्रेसचा उमेदवार असे हे चार उमेदवार असतील. भाजपचे देखील दोन उमेदवार अगदी सहज निवडून येतील. त्यामुळे मागचे काही दिवस जे काही काटे की टक्कर, चुरस असे चित्र निर्माण केले जाते, तसं काही होणार नाही. महाराष्ट्रात हा भ्रम पसरवला जातोय. आम्हाला 169 आमदारांचा पाठिंबा आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
ही एक अफवा - शरद पवारांनी जास्तीच्या कोटा मागितल्याच्या वृत्तावर राऊत म्हणाले की, "या सर्व अफवा आहेत. आमची सर्वांची बैठक झाली होती. या बैठकीत सर्वांचा कोटा ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे ज्याचा जितका कोटा या बैठकीत ठरलेला आहे, त्यांना तितकी मते मिळतील. ही अफवा भाजप कडून पसरवली जात आहे, हे एक गणित आहे. या ठरलेल्या गणिता प्रमाणेच मतं मिळतील. यासंदर्भात माझं आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ( CM Uddhav Thackeray) शरद पवारांशी सविस्तर बोलणे झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत." अस त्यांनी स्पष्ट केले.