मुंबई - मराठ्यांचे आंदोलन आता तीव्र स्वरूप धारण करत आहे. आज (शनिवार) मराठा समाजातील आंदोलक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'वर मशाल मोर्चा नेणार आहेत. पंढरपुरातून हा आक्रोश मोर्चा निघत आहे.
मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. समाजामधील हा रोष विविध आंदोलन आणि बैठकांमधून व्यक्त होत आहे. एमपीएससीची परीक्षा घेण्याचा अट्टाहास, नोकरभरती करण्याचा निर्णय, यासारख्या राज्य सरकारच्या काही निर्णयांमुळे मराठा समाजाच्या असंतोषात भर पडली आहे. आरक्षणाला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरकारने जबाबदारीने आणि अत्यंत तातडीने पावले उचलून मराठा विद्यार्थ्यांचे, तरुणांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित होते. तसेच स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात घटनापीठाची निर्मिती करण्यासाठी अर्ज करणे, प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु या सर्व आघाड्यांवर हे आघाडी सरकार अपयशी ठरले. मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली उपसमिती योग्य तो निर्णय घेण्यात अपयशीच ठरली नाही, तर स्वतः अशोक चव्हाणही गोंधळात असल्याचा आरोप आंदोलक करत आहे.