मुंबई - व्यंगचित्राच्या माध्यमातून राजकीय फटकारे मारणाऱ्या मार्मिकने आज हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. प्रिंट स्वरूपातील मार्मिक कात टाकणार असून लवकरच डिजिटल स्वरूपात वाचकांच्या हाती येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मार्मिकच्या वर्धापनदिनी केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून व्यंगचित्र रेखाटून राजकीय इतिहास घडवला. मार्मिक मधून त्यांनी त्यावेळी अन्यायाविरोधात वाचा फोडली, अशा शब्दांत मार्मिकच्या आठवणींना उध्दव ठाकरे यांनी उजाळा दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच मार्मिकचा वर्धापनदिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी कलाकारांनी पोवाडे, गीत गायन केले. योगायोग आहे मला ही 60 वर्ष पूर्ण झालीत. आज मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर आहे. त्यावेळचे सोबती आज दुर्दैवाने सोबत नसले तरी, सर्वांच्या सोबतीने वाटचाल आम्ही तिघांनी पूर्ण केली. सध्या ऑनलाइनच युग आहे. कोरोना काळात सामना शिवसेनेचे मुखपत्रही सुरू आहे. अन्यायाविरोधात ही सर्वांचा सामना सुरू आहे असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले.