मुंबई - वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाला कधी सुरुवात होणार याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे. पण आता लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. कारण वरळीच्या बांधकामासाठी अखेर म्हाडाने 14 मार्चचा मुहूर्त शोधला आहे. 14 मार्चला एका भव्य कार्यक्रमात बांधकामाचा नारळ फोडला जाणार असून या कार्यक्रमासाठीच्या तयारीला म्हाडा लागले आहे. तर 14 मार्चच्या मुहूर्ताला मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दुजोरा दिला आहे.
2017 मध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन
शिवडी, वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग अशा चार बीडीडी चाळीच्या वसाहती आहेत. या वसाहतीमधील इमारती 100 वर्षे जुन्या झाल्या असून त्यांची पुरती दुरवस्था झाली होती. त्यामुळे या चाळीच्या पुनर्विकासाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण या इमारती म्हाडाच्या अखत्यारीत येत नसल्याने याचा पुनर्विकास कोण करणार या विचारात पुनर्विकास रखडला होता. शेवटी राज्य सरकारने म्हाडाकडे हा प्रकल्प सोपवला आणि पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. शिवडी वगळता वरळी, ना.म. जोशी आणि नायगावच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन मोठ्या थाटामाटात 22 एप्रिल 2017 मध्ये जांबोरी मैदानात करण्यात आले. त्यानंतर ना.म.जोशी आणि नायगावसाठी कंत्राटदार अंतिम करत पत्राता निश्चितीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पण अजून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसून काम रखडलेले आहे. दुसरीकडे वरळीसाठी टाटा कंपनीची निवड 2018 मध्ये करण्यात आली. पण या प्रकल्पाला ही अद्याप सुरवात झालेली नाही. त्यामुळे रहिवाशांना पुनर्विकासाची प्रतीक्षा आहे.
पात्रता निश्चितीचा मुद्दा निकाली
म्हाडाने आधी रहिवाशांची बायोमेट्रिक पात्रता निश्चिती करत पात्र रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याचे ठरवले. यासाठी सरकारने 27 जून 2017 ही डेडलाईन पात्रतेसाठी निश्चित केली. पण याला रहिवाशांनी विरोध केला. पात्रता निश्चिती सुरू होईपर्यंत अनेकांनी घरे विकली वा हस्तांतरित केली होती. असे रहिवासी अपात्र ठरत होते. त्यामुळे या प्रक्रियेला जोरदार विरोध झाला आणि यामुळेच प्रत्यक्ष काम सुरू करण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता मात्र हा मुद्दा सरकारने निकाली काढला आहे. कारण आता 1 जानेवारी 2021 पर्यंतच्या रहिवाशांना पात्र करण्यात आले आहे. तेव्हा आता सर्वच्या सर्व रहिवासी पात्र झाल्याने या रहिवाशांशी करार केला जाणार आहे. तर दुसरीकडे वरळी मोठ्या प्रमाणात रिकाम्या जागा आहेत. तेव्हा या ठिकाणी पुनर्वसन इमारती बांधत त्यात काही रहिवाशांना हक्काची घरे देत त्यांच्या जुन्या चाळी रिकाम्या करत त्या पाडून पुढच्या पुनर्वसन इमारतीच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळे वरळीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात राहायला जावे लागणार नाही.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकामाच्या शुभारंभाचा नारळ फुटणार?
वरळी बीडीडीच्या पुनर्विकासातील सर्व अडथळे दूर करत आता प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 14 मार्चपासून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हा दिवस म्हाडाने ठरवला असून या दिवशी मोठ्या थाटामाटात कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात येणार असल्याचेही समजते आहे. याविषयी म्हासे यांना विचारले असता त्यांनी 14 मार्चचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे असे सांगितले आहे. तर मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच आता वरळीच्या कामाला सुरुवात होणार असून कित्येक वर्षे पुनर्विकासाचे, मोठ्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या वरळीकरांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल.
हेही वाचा -महिला रुग्णाला शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर बडतर्फ
हेही वाचा -मुंबईत पुन्हा छापेमारी, चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा