मुंबईराज्यातील दुकाने आणि आस्थापनांच्या नावाच्या पाट्या मराठीमध्ये करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) आपल्या हद्दीतील दुकाने आस्थापनांना तीन वेळा मुदत दिली आहे. तिसऱ्यांदा दिलेली मुदत आता संपत आली आहे. त्यानंतरही केवळ ४० टक्के दुकानांच्या पाट्या मराठीमध्ये करण्यात आल्या आहेत. यामुळे ६० टक्के दुकानदारांना पुढील १० दिवसात आपल्या दुकानावरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत. अन्यथा त्यांच्यावर नियमानुसार पालिकेकडून कारवाई ( shops despite extension Action ) केली जाणार आहे.
तीन वेळा मुदतवाढ राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबईतील दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानांवर मराठी पाट्या ठळकपणे दिसतील अशा प्रकारे लावण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने ( Mumbai Municipal Corporation ) दुकानदारांना ३१ मे ची डेडलाईन दिली होती. व्यापारी संघटनांकडून अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी लावून धरण्यात आली होती. मराठी पाट्यांसाठी कलाकार उपलब्ध नसणे, मटेरिअल महागले आहे, असे सांगत अंमलबजावणीला दिरंगाई होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर ही व्यापाऱ्यांनी मराठी पाट्या न लावता सहा महिन्याची मुदत वाढ मागितली. त्यावर आयुक्तांनी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.
तर नियमानुसार कारवाईदुकानांवर मराठी नावाच्या पाट्या लावण्यासाठी पालिकेने व्यापाऱ्यांना ३ वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यानंतरही व्यापाऱ्यांनी मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. मुंबईमधील ५ लाख दुकानांपैकी सुमारे २ लाख म्हणजे ४० टक्के दुकानांनी मराठी पाट्यांची अंमलबजावणी केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजेच पुढील दहा दिवसात इतर ६० टक्के व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत मराठी पाट्यांची अंमलबजावणी न झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार, असल्याची माहिती पालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्याच्या प्रमुख अधिकारी सुनिता जोशी यांनी दिली आहे.