महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत गदारोळ

ओबीसी समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. मंगळवारी (उद्या) सभागृहात या विषयांवरील प्रस्ताव मांडून त्यावर सविस्तर चर्चा करायला परवानगी दिली जाईल, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

पावसाळी अधिवेशन
पावसाळी अधिवेशन

By

Published : Jul 5, 2021, 4:09 PM IST

Updated : Jul 5, 2021, 5:11 PM IST

मुंबई - राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला. मंगळवारी (उद्या) सभागृहात या विषयांवरील प्रस्ताव मांडून त्यावर सविस्तर चर्चा करायला परवानगी दिली जाईल, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी मात्र यावर आक्षेप घेत आजच चर्चा घडवून आणा, अशी मागणी लावून धरली. सभापतींनी ही मागणी फेटाळून लावल्याने विरोधक आक्रमक झाले आणि सभागृहात उतरून घोषणाबाजी केली. यावेळी उडालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

'आरक्षणाच्या मुद्द्यावर आजच चर्चा घडवा'

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले. पहिल्याच दिवशी कोणताही स्थगन प्रस्ताव घेणार नाही. मात्र, २८९ नुसार चर्चा घडवून आणू, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सुरूवातीला सभागृहाला स्पष्ट कल्पना दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे बोलू लागले. मात्र, मराठा आरक्षणाबाबत माहीत असलेले मुद्दे पुन्हा मांडून सभागृहाचा वेळ घेऊ नका, नवीन काही मांडायचे असेल, बोलायचे असेल तर त्याबद्दल बोला, अशी समज सभापती निंबाळकर यांनी वारंवार दिली. मात्र मेटे यांनी बोलणे सुरूच ठेवत विषय भरकटवल्याने सभापतींनी वार्षिक अहवाल मांडण्याची परवानगी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या मेटे आणि भाजपाच्या सदस्यांनी व्हेलमध्ये येत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे कामकाज चालवणे कठीण झाल्याने सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले.

१५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरूनही भाजपा सदस्यांनी गदारोळ घातला. ग्रामविकासमंत्री सतेज पाटील यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सभागृहात निवेदन देत केंद्र सरकारने राज्य सरकारला मागास प्रवर्गाची सर्व माहिती (इम्पेरिकल डेटा) तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी शिफारस विधान परिषदच्यावतीने केंद्र सरकारला करत आहे, असे सांगितले. मात्र, यावरही प्रवीण दरेकर आणि गोपीचंद पडळकर यांनी हरकत घेत, यावर आजच चर्चा घडवून आणा, अशी आग्रही मागणी केली. मात्र, या महत्त्वाच्या विषयांवर सरकार उद्या प्रस्ताव सादर करून भूमिका मांडणार आहे. त्यामुळे त्यावर उद्या बोलू, असे सभापतींनी स्पष्ट केले. मात्र, सभागृहाचे इतर कामकाजही महत्त्वाचे आहे, असे सांगून पुढील कामकाजला सुरूवात केली. भाजपा सदस्यांनी व्हेलमध्ये येऊन पुन्हा गदारोळ घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी दुसऱ्यांदा तहकूब करावे लागले.

Last Updated : Jul 5, 2021, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details