मुंबई - राज्यात रविवारी 11 ऑक्टोबररोजी होत असलेली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात यावी, तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगिती बद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सायंकाळी साडेचार वाजता वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत.
मराठा क्रांती मोर्चाचे नेते घेणार मुख्यमंत्र्यांची भेट - maratha kranti morcha cm meeting
राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात यावी, तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगिती बद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, खासदार संभाजीराजे भोसले यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे इतर नेतेही यावेळी उपस्थित असणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ठरविण्यासाठी आज सकाळपासून मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू असून या बैठकांमध्ये एमपीएससीची परीक्षा हा प्रमुख मुद्दा असला तरी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या संदर्भात केलेल्या टीकेवर ही चर्चा सुरू असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही आज भेटल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून पुढील रणनीती काय असेल, याची माहिती आम्ही देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एमपीएससीची परीक्षा तातडीने रद्द करावी मराठा आरक्षण जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत ही परीक्षा घेऊ नये असा आग्रह आम्ही या बैठकीत धरणार असल्याचेही ते म्हणाले.