मुंबई -भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने राज्यातील मराठा समाजाची घोर फसवणूक केली असा आरोप करत, सोमवारी मराठा क्रांती मोर्चा आणि शिव प्रहार या संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा... ...मग महाराष्ट्राच्या करदात्यांचा पैसा नेमका कुठे खर्च केला जातो? - कॉ. विश्वास उटगी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मराठा समाजावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून फडणवीस सरकारला सळो कि पळो करून सोडणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने यावेळी सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असा दावा करत मराठा क्रांती मोर्चा आणि शिव प्रहार संघटनेच्या नेत्यांनी मुंबईत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राज्यातील संपूर्ण मराठा समाज आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही या दोन्ही संघटनांच्या नेत्यांकडून देण्यात आली.