महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नांदेडमध्ये पकडलेल्या गांजाचे माओवादी कनेक्शन? एनसीबीकडून तपास सुरू - नांदेडमध्ये पकडलेल्या गांजाचे माओवादी कनेक्शन?

एनसीबीने नांदेडमध्ये केलेल्या कारवाईत गांजा पकडला असून या प्रकरणी एका ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधून महाराष्ट्रात वितरणासाठी येत होता. यामागे नक्षलवादी गटाचा सहभाग आहे का? याचा तपास एनसीबी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नांदेडमध्ये पकडलेल्या गांजाचे माओवादी कनेक्शन? एनसीबीकडून तपास सुरू
नांदेडमध्ये पकडलेल्या गांजाचे माओवादी कनेक्शन? एनसीबीकडून तपास सुरू

By

Published : Nov 16, 2021, 5:18 PM IST

मुंबई :एनसीबीने नांदेडमध्ये केलेल्या कारवाईत गांजा पकडला असून या प्रकरणी एका ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधून महाराष्ट्रात वितरणासाठी येत होता. यामागे नक्षलवादी गटाचा सहभाग आहे का? याचा तपास एनसीबी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्य सूत्रधारचा शोध
एनसीबीकडून सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईत दोन आरोपींना पकडण्यात आले असून मुख्य सूत्रधार कोण याचा शोध एनसीबी घेत आहे. या गांजाच्या नक्षलवादी कनेक्शनसंदर्भातही तपास करण्यात येत आहे. मंगळवारी आरोपींना नांदेड न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. एनसीबीकडून त्यांच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना मुंबईत आणून त्यांची चौकशी केली जाईल.

सोमवारी सकाळी कारवाई
हैदराबाद-नांदेड मार्गावर नायगाव तालुक्यातील मंजरम येथे एनसीबीने सोमवारी सकाळी ही कारवाई केली. आंध्र प्रदेशातून काही संशयित लोखंडी सळ्यांमध्ये लपवून गांजा घेऊन येत असल्याची माहिती मुंबई एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार नांदेडमध्ये सापळा रचण्यात आला होता. ज्यावेळी हा ट्रक राज्याच्या हद्दीत दाखल झाला. त्यावेळी तो ट्रक संशयावरून थांबविण्यात आला. तपासणीत ट्रकमध्ये लोखंडी सळ्यांमध्ये ४४ गोणी गांजा लवपून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

१,१२७ किलो गांजा जप्त
एनसीबीने एकूण १,१२७ किलो गांजा जप्त केला असून त्यांची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशात नक्षली भागात गांजाची शेती करून त्याचे वितरण केले जात असल्याचे यापूर्वीच्या कारवायांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या या गांजामागे नक्षलवाद्यांचा सहभाग आहे का, याबाबतही एनसीबी तपास करत आहे. आरोपींनी यापूर्वीही गांजाचे वितरण केल्याचा संशय असून त्याबाबत तपास सुरू असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details