मुंबई: महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये छापेमारी केली. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड या चार ठिकाणी देशविरोधी कृत्य केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल करून २० पदाधिकारी आणि 'पीएफआय'शी संबधितांची धरपकड केली. मुंबई तसेच आसपासच्या परिसरातून शेख सादिक, मोहम्मद इकबाल खान, मझहर खान, मोमीन मिस्त्री, आसिफ खान या पाच जणांना अटक करण्यात आली. या पाच जणांना एटीएसने गुरुवारी संध्याकाळी सत्र न्यायालयात हजर केले. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केली. मात्र, न्यायाधीशांनी सुनावणीअंती त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली. यापैकी काही आरोपी उच्च शिक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. मझहर हा हा कुर्ल्यात राहणारा असून सेल्समनची नोकरी करत होता.
देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे PFI या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल आहे. त्याच अनुषंगाने पहाटे पुण्यातील कोंढवा येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत PFI संघटनेच्या पूर्वाश्रमीच्या दोन सदस्यांना अटक केली. कयूम शेख आणि रजी अहमद खान अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कयूम शेख हा आयटीमध्ये काम करत आहे तर रजी अहमद हे बिल्डर आहे. नेरूळच्या पीएफआयची जबाबदारी सांभाळणाऱ्या आसिफ शेख यांना पहाटे ४ च्या सुमारास घरातून ताब्यात घेऊन कार्यालयात आणण्यात आले होते. त्याठिकाणी पहाटे ५ ते दुपारी १ पर्यंत कागदपत्रांची झाडाझडती सुरु होती. त्यानंतर मोठया प्रमाणात कागदपत्रे सोबत घेऊन एनआयएच्या पथकाने दुपारी दिड वाजता तिथून पाय काढला.