मुंबई - राज्य सरकारने लॉकडाऊनमधील अटींमध्ये सवलत देत मिशन बिगिन अगेन सुरू केले आहे. त्यानुसार उद्या (बुधवार) 8 जुलैपासून हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, हॉटेल चालकांकडे आवश्यक तितके मनुष्यबळ नसल्याने हॉटेल्स खरेच सुरू होतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस उद्यापासून ३३ टक्के क्षमतेत सुरू होणार आहेत. मात्र, हॉटेल सुरू करताना हॉटेल चालक आणि मालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे.
सरसकट हॉटेल सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. प्रतिबंधित क्षेत्रात अद्यापही हॉटेल सुरू करता येणार नाहीत. मुंबईमध्ये नव्या नियमावलीनुसार अनेक क्षेत्रे अजूनही कंटेन्मेंट झोनमध्ये येतात. त्यामुळे अनेक हॉटेल मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेल पूर्णपणे बंद होती. त्यामुळे या व्यवसायात कोणतेही उत्पन्न नव्हते. हॉटेल मालक तसेच कर्मचारी ही त्यामुळे अडचणीत आहेत. मात्र, मुंबईत काही ठिकाणी का होईना सुरू होत आहे, हे महत्त्वाचे आहे. सरकारचे धन्यवाद पण हॉटेल सुरळीत होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. कामगार जे परराज्यात गेले आहेत, त्यांना परत यायला वेळ लागेल. त्यामुळे हळूहळू जमवाजमव करून आम्ही हॉटेल उद्यापासून सुरू करत आहोत, असे दादर येथील प्रसिद्ध हॉटेल मनोहरच्या मालकांनी सांगितले.
हेही वाचा -अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
लॉजिंगची व्यवस्था असलेली हॉटेल सुरू करण्यासाठी अटी आहेत. केवळ 33 टक्के आस्थापनेवर हॉटेल सुरू करता येतील. कोविडच्या आपत्ककालीन स्थिती अर्थात क्वारंनटाईनसाठी 67 टक्के खोल्या राखून ठेवाव्या लागतात. प्रवासी वाहतुकीवरील बंदीमुळे हॉटेलमध्ये राहण्यासाठी कोण येणार, असा प्रश्न आहे. ज्या 33 टक्के भागावर परवानगी दिली गेली आहे, तेथे राहणाऱ्या प्रवाशांच्या सॅनिटायझरसह हॅन्ड वॉश व्यवस्था हॉटेल चालकांनाच करावी लागणार आहे. ग्राहकाने खोली सोडल्यानंतर निर्जंतुकीकरण करावे लागेल. त्यानंतर 24 तास खोली वापरण्यास मनाई असेल.
सध्या वेळेच्या अधीन राहून पार्सल देण्यास हॉटेलचालकांना परवानगी दिली गेली आहे. शासनाने लॉजिंगमध्ये 33 टक्के खोल्या भरतील इतक्या प्रवाशांना परवानगी दिली आहे. ज्या हॉटेल्समध्ये लॉजिंगची व्यवस्था आहे, तेथे जे प्रवाशी उतरतील त्यांनाच जेवण देता येईल. पूर्णपणे उपहारगृह सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. अशा नियमात राहून आपला व्यवसाय कसा चालणार, असे साई लॉजिंग बोर्डिंगचे प्रदीप राठोड यांनी सांगितले.