मुंबई -काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिनेटीन स्पोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात असून आतापर्यंत या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचादेखील समावेश आहे.
नेमके काय होता घटनाक्रम -
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर जसा तपास हा पुढे जात होता, त्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी अटक सत्र सुरू केले. मुंबई पोलीस खात्यातील क्राईम ब्रँचच्या युनिट 12 चे पोलीस निरीक्षक सुनील मानेला या प्रकरणी अटक करण्यात आली. सुनील माने याच्या चौकशीदरम्यान आत्तापर्यंतच्या मिळालेल्या माहितीवरून मनसुख हिरेन त्याची हत्या करण्यामध्ये सुनील मानेने महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. 4 मार्च रोजी सुनील माने हा त्याचा मोबाईल फोन त्याच्या बोरीवलीतील कार्यालयामध्ये सोडून एका पाढऱ्या रंगाच्या गाडीने ठाण्यातील कळवा रेल्वे स्थानकाकडे निघाला होता. त्यारात्री 8 वाजून 40 मिनिटांनी कळवा रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्याने सचिन वाझेला व्हाट्सअप कॉलिंगद्वारे संपर्क करून तो आला असल्याचे कळवले. त्यानंतर सचिन वाझे आणि सुनील माने हे दोघेही त्याच पांढऱ्या रंगाच्या गाडीत बसून नंतर ठाण्यातील माजिवडाच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, मनसूख हीरेनला व्हाट्सअप कॉल करून माजीवाडा येथे बोलावण्यात आले. या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनसुख हिरेन हा सुनील मानेच्या गाडीत बसत असल्याचेदेखील समोर आले आहे. या वेळेस सुनील माने हा वाहन चालवत असताना त्याच्या बाजूच्या सीटवर सचिन वाझे हा बसलेला होता. तर मागच्या सीटवर मनसुख हिरेन हा बसला होता. मनसुख हिरेनला घेऊन सुनील माने व सचिन वाझे हे दोघेही वसईच्या दिशेने निघाले होते. यानंतर ठरल्याप्रमाणे काही अंतरावर लाल रंगाची टवेरा गाडी ही रस्त्यावर एका ठिकाणी उभी करण्यात आली होती. या गाडीजवळ आल्यानंतर सचिन वाझेने हिरेन यांना लाल रंगाच्या टवेरा गाडीमध्ये बसण्यास सांगितले. या गाडीत आधीच चार जण बसलेले होते. या चौघांनी मिळून हिरेन मनसुख यांची हत्या केला असल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे.