मुंबई -भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर सर्वच स्तरांतून दानवे यांनी केलेल्या अजब दाव्याबद्दल प्रतिक्रिया येऊ लागल्या. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मंजिंदरसिंग सिरसा यांनी दानवेंच्या दाव्यावर नाराजी व्यक्त करत हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे ट्विट त्यांनी केले.
रावसाहेब दानवे प्रकरण : किसान का अपमान नही सहेंगे... अकाली दल आक्रमक अद्याप दानवे यांनी त्यांच्या विधानाबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र या वक्तव्यामुळे दानवेंवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.
काय म्हणाले होते दानवे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करायला तयार आहेत. पण बाकीच्या लोकांना हे मान्य नसून सध्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला.
या देशात आधी सीएए आणि एनआरसीमुळे उचकवण्यात आले. या कायद्यामुळे एक मुस्लीम तरी देशाबाहेर गेला का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. हे आंदोलन बाहेरच्या देशाचं षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असंही दानवे म्हणाले. आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन देखील दानवे यांनी केलं.
राज्यमंत्री बच्चू कडू संतापले
वादग्रस्त विधान आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे समीकरण नवीन नाही. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक आरोप दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या या विधानावर महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार केला आहे. आता दानवे यांना घरात जाऊन घुसून मारावं लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
रावसाहेब दानवे मूळचे हिंदुस्तानचे की पाकिस्तानचे ?
रावसाहेब दानवे मूळचे हिंदुस्तानचे की पाकिस्तानचे याचा डीएनए तपासावा लागेल. आधी दानवेंच्या घरावर आंदोलन केले. आता दानवे यांना घरात घुसून मारावं लागेल, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या या आरोपाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत लाखो शेतकरी मागील १३ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. परंतु या आंदोलनावर भाजपा नेत्यांकडून वारंवार टीका होत आहे. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका करत या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा केला.