मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांकडून टीकास्त्र सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी राणेंवर कडाडल्या. राणेु, तुमच्या अंगणात जे दोन धतुरे उगवलेत, त्यावर लक्ष द्या अशा शब्दांत समाचार घेतला. मुंबईमध्ये प्रसाद लाड यांनी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती.
राणे म्हणाले होते, आमचे आशिष शेलार कवी आहेत. बोलता बोलता ते म्हणाले, चाफा बोलेना, चाफा उगवेना. पण असाही एक चाफा आहे जो उगवत नाही, फुलत नाही आणि त्याला वासही येत नाही. असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे, बाकी कुठे नाही, अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. तसेच उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांच्या नखाची देखील सर नसल्याचे म्हटले होते. साहेब साहेब होते. साहेबांच्या नखाची सर या माणसाला नाही. बाळासाहेब आग होते.