मुंबई - मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर दोन लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. रस्त्यांच्या उंचीप्रमाणे हे मॅनहोल असल्याने रस्ते वाहतुकीला कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. मॅनहोल उंच किंवा खाली असल्याने कोणत्याही दुर्घटना घडल्या नसल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
रस्त्याच्या उंचीचे मॅनहोल -
मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई महापालिका आदी सरकारी यंत्रणांच्या अखत्यारित रस्ते येतात. या रस्त्यांची डागडुजी, त्याचे बांधकाम त्या विभागाकडून केले जाते. त्यापैकी बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित २,०५५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाचे पाणी गटारे, नाल्यामधून समुद्रात आणि खाडीत सोडता यावेत म्हणून मॅनहोल बसवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर तब्बल दोन लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. शहरातील रस्ते वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या मॅनहोलची उंची रस्त्याच्या उंची इतकीच ठेवण्यात आली आहे. मॅनहोलची उंची कमी किंवा जास्त असल्याची तक्रार आल्यावर त्याची दखल घेऊन पालिकेच्या पर्जन्य जल वाहिन्या व मलनिस्सारण विभागाकडून त्वरित दुरुस्ती केली जाते. यामुळे रस्त्यावरील मॅनहोल उंच किंवा खोल असल्यामुळे रस्ते वाहतूक खोळंबली अशी तक्रार कधीही आलेली नाही असे या अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेच्या दाव्यात तथ्य -
मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी मुंबईमधील रस्त्यांचा आढावा घेतला असता अधिकाऱ्यांनी केलेला दावा योग्य असल्याचे दिसून येते. मुंबईमधील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवर मॅनहोल रस्त्याच्या उंचीपेक्षा जास्त किंवा खाली असल्याचे दिसून आलेले नाही. मुंबईमधील रस्ते वाहतुकही सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले.