मुंबई -आचार्य रजनीश तथा ओशो यांच्या आश्रमातील गैरकारभाराची भारत सरकारने चौकशी करावी अशी मागणी ओशोंच्या अनुयायांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे. ओशो आश्रम संचालक कोट्यावधींचा महसूल चोरून थेट परदेशात पैसा पाठवित आहे असा आरोप स्वामी योगेश यांनी केला आहे. तर कृष्णमिलन शुक्ला यांनी ओशोंच्या अनुयायांना आश्रमात येण्यास बंदी घालणे हे अन्यायकारक आहे असे म्हटले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि ओशो अनुयायांची बैठक आश्रमाच्या नावाने मोठे गैरव्यवहार -
आचार्य रजनीश तथा ओशो हे अध्यात्मिक गुरू म्हणून जगप्रसिध्द असून त्यांचे जगभरात अनुयायी आहेत. त्यांचे निधन होऊन 21 वर्षे लोटली आहेत. या काळात त्यांच्या पुण्यातील ओशो आश्रमात संचालकांनी अनेक गैरकारभार केले आहेत. मागील 50 वर्षे जे अनुयायी आचार्य रजनीश तथा भगवान ओशो यांची सेवा करीत होते, अशा अनुयायांना ही पुण्यातील ओशो आश्रमात प्रवेश दिला जात नाही. ओशो आश्रमाची पुण्यात एकूण 20 एकर जमीन असून त्यातील ४ एकर जमीन ओशो आश्रमाच्या विद्यमान संचालकांनी विकली आहे. त्या व्यवहारास 3 हजार 200 लोकांनी आक्षेप घेणारे धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केले आहेत. ओशो आश्रमाचे नाव बदलून ओशो रिसॉर्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ओशो अनुयायांच्या भावना दुखविण्याबरोबर आश्रमाच्या नावाने मोठे गैरव्यवहार झालेत. या प्रकरणाची भारत सरकारने सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी ओशो अनुयायांनी आज (शुक्रवार) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.
भारत सरकारने सखोल चौकशी करावी -ओशो अनुयायांंची मागणी
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि ओशो अनुयायांची बैठक झाली. त्यावेळी ओशो आश्रमातील गैरव्यवहार तसेच आर्थिक घोटाळा तसेच राज्य आणि केंद्र सरकारला मिळू शकणारा कोट्यावधी रुपयांचा महसूल ओशो आश्रम बुडवीत असल्याचा आरोप अनुयायांनी दिलेल्या निवेदनात केला आहे. पुण्यातीत कोरेगाव पार्क येथे ओशो आश्रमाची 20 एकर जागा आहे. ती बेकायदेशीरपणे विकण्याचा डाव आश्रम संचालकांचा आहे. जमीन विकल्यानंतर त्याचा पैसा थेट परदेशात पाठविण्यात येत आहे. ओशो आश्रमात प्रवेशासाठी घेण्यात येणारे 2 हजार रुपये शुल्क त्यातून आश्रमाला कोट्यावधींचा निधी मिळत असून तो निधी भारतातील कामामध्ये न ठेवता परदेशातील बँक खात्यात पाठविला जात आहे. पुण्यातील ओशो आश्रमातील बुद्धा हॉलमधील बुद्ध मूर्ती आश्रम संचालकांनी गायब केली आहे. ओशो यांनी लिहिलेली पुस्तके आणि इतर वस्तूंची रॉयल्टी स्वरूपात कोट्यावधी रुपये ओशो आश्रमास मिळत असून ती रक्कम भारतात येत नसून ओशो इंटरनेशनलच्या नावाने परदेशात जात आहे. ओशो आश्रमात येणारा पैसा, होणारे व्यवहार, जमीन विक्री आदींची भारत सरकारने सखोल चौकशी करून ओशो आश्रमात भक्तांसाठी, अनुपायांसाठी विनामूल्य खुला करावा अशी मागणी ओशो अनुयायांनी केली रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.
'डोंबिवली अत्याचारातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी'
डोंबिवली येथे झालेली अत्याचाराची घटना ही अत्यंत दुर्देवी आहे. मी त्या पीडितेला दाखल केलेल्या रूग्णालयाच्या प्रमुखांशी बोललो आहे. त्या पीडितेची परिस्थिती आता ठीक असून तिला लवकरच सुट्टी देण्यात येणार आहे. मी स्वतः त्याठिकाणी जाणार आहे. सरकारने अशी प्रकरणे ही फास्टट्राक न्यायालयात चालवली पाहिजेत आणि या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
हेही वाचा -पुन्हा घंटा वाजणार.. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू, मात्र.. शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली