मुंबई -मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आता पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. दरवर्षी प्रमाणे मलेरिया, डेंग्यू, कावीळ, लेप्टो, गॅस्ट्रो या रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाला रोखण्याचे काम करताना पावसाळी आजारांना रोखण्याचे काम आरोग्य विभागाला करावे लागत आहे. मुंबईमध्ये सध्या गॅस्ट्रो आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी रस्त्यावरील पदार्थ खाऊ नयेत तसेच डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
गॅस्ट्रो मलेरीयाचे रुग्ण वाढले -जून महिन्यात १२ दिवसात मलेरियाचे १२७ रुग्ण आढळून आले आहे. मे महिन्यात २३४ रुग्ण आढळून आले होते. तर जून २०२१ मध्ये ३५० रुग्ण आढळून आले होते. लेप्टोचे ४ रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात ४ रुग्ण आढळून आले होते. तर जून २०२१ मध्ये १५ रुग्ण आढळून आले त्यापैकी १ मृत्यू झाला आहे. डेंग्यूचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात ३४ रुग्ण आढळून आले होते. तर जून २०२१ मध्ये डेंग्यूचे १२ रुग्ण आढळून आले होते. गॅस्ट्रोचे २०१ रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात ६३० तर जून २०२१ मध्ये १८० रुग्ण आढळून आले होते. हेपॅटिटीस म्हणजेच काविळचे २६ रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात २४ तर जून २०२१ मध्ये १९ रुग्ण आढळून आले होते. एच १ एन १ चा १ रुग्ण आढळून आला आहे. मे आणि जून २०२१ मध्ये एच १ एन १ चा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मलेरियाचे वरळी, दादर धारावी, भायखळा येथे तर गॅस्ट्रोचे वांद्रे पूर्व, कुर्ला, मानखुर्द गोवंडी, मालाड येथे सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
गेल्या सहा महिन्यात एकही मृत्यू नाही -१ जानेवारी ते १२ जून २०२२ पर्यंत मलेरियाचे १०२०, लेप्टोचे २७, डेंग्यूचे ९८, गॅस्ट्रोचे २५६४, हेपॅटिटीसचे २१५, चिकनगुनियाचे ४ तर एच १ एन १ चे ३ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या सहा महिन्यात पावसाळी आजारांमुळे एकही मृत्यू झालेला नाही. २०२१ मध्ये मलेरियाचे ५१७२, लेप्टोचे २२४, डेंग्यूचे ८७६, गॅस्ट्रोचे ३११०, हेपॅटिटीसचे ३०८, चिकनगुणियाचे ८० तर एच १ एन १ चे ६४ रुग्ण आढळून आले आहेत. २०२१ मध्ये मलेरियाचा १, लेप्टोचे ६, डेंग्यूचे ५ तर हेपॅटिटीसच्या १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर २०२० मध्ये मलेरियाचे ५००७, लेप्टोचे २४०, डेंग्यूचे १२९, गॅस्ट्रोचे २५४९, हेपॅटिटीसचे २६३, एच १ एन १ ४४ रुग्ण आढळून आले आहेत. २०२० मध्ये मलेरियाचा १, लेप्टोचे ८, डेंग्यूचे ३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
मृत्यू संख्या घटली -जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये लेप्टोचे ११, डेंग्यूचे ३, हेपॅटिटीसचे १, एच १ एनमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये मलेरियाच्या १, लेप्टोच्या ८, डेंग्यूच्या ३ अशा १२ जणांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये मलेरियामुळे १, लेप्टोमुळे ६, डेंग्यूमुळे ५ तर हेपॅटिटीसमुळे १ अशा १२ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत एकही मृत्यू झालेला नाही.