मुंबई - चिपळूण तालुक्यातील नागरिकांसाठी मंगळवारची रात्र ही काळरात्र ठरली. तिवरे धरण फुटल्याने जवळपास २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी ६ मृतदेह हाती लागले असून बचावकार्य सुरू आहे. राज्यात यापूर्वीही अशा स्वरुपाच्या अनेक घटना घडल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा 12 जुलै 1961ला पुण्यात हाहाकार माजला होता, पाणशेत धरण फुटल्याने हजारो कुटुंबांवर भयानक संकट ओढावले होते. त्यानंतरही राज्यात अनेक घटना घडल्या. या सर्व घटनांचा घेतलेला आढावा.
पानशेतचा प्रलय - 12 जुलै 1961
पुणे शहराच्या इतिहासात १२ जुलै १९६१ हा दिवस भीषण काळरात्र ठरला. त्या दिवशी पानशेत धरण फुटले. संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. एकूण ७५० घरे उद्धस्त झाली. तब्बल २६ हजार कुटुंबांच्या घरगुती मालमत्तेची संपूर्ण हानी झाली. १० हजार कुटुंबे बेघर झाली. सुमारे सोळा हजार दुकानांतील वस्तूंचे साठे नष्ट झाले. या दुर्देवी घटनेत जवळपास १ हजार नागरिकांचा मृत्यू झाला.
महाड दुर्घटना : सावित्रीचा रुद्रावतार - 2 ऑगस्ट 2016
रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली. साधारणपणे १०० वर्षापासून या पुलावरुन वाहतूक सुरु होती. कोकणहून मुंबईकडे येणारी वाहने या पुलावरुन जायची. मात्र, पुलाची दुरावस्था आणि ३ दिवसांपासून कोकणात सुरू असणारा पाऊस यामुळे हा पूल मध्यरात्री वाहून गेला. या घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला.
मुठा कालवा फुटला - 27 सप्टेंबर 2018
पुण्याच्या दांडेकर पूल येथील मुठा कालव्याला भगदाड पडल्यामुळे शहराला पुराचे स्वरुप आले होते. कालव्याच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील २०० हून अधिक कुटुंबाचे संसार या पाण्यात वाहून गेल्याने येथील नागरिक बेघर झाले. यात जीवितहानी झाली नसली तरी अनेकांची स्वप्न या पाण्यात वाहून गेली.