महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माहुल प्रकल्पग्रस्तांचा शिवसेना भवनावर आज धडक मोर्चा

माहुल प्रकल्पग्रस्तांना आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत म्हाडाकडून ३०० घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्याची पूर्तता अद्याप न झाल्याने माहुल प्रकल्पग्रस्तानी आज (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता शिवसेना भवनावर मोर्चा नेला जाणार आहे. प्रदूषणामुळे प्रकल्पग्रस्तांना आजार झाले असून त्यात गेल्या दोन वर्षात १५० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मागील आंदोलनात मेधा पाटकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर

By

Published : Aug 9, 2019, 10:08 AM IST


मुंबई -तानसा पाईपलाईन, रस्ते विकासात बाधित झालेल्यांचे महापालिकेने प्रदूषणयुक्त माहुलमध्ये पुनर्वसन केले आहे. या प्रकल्पग्रस्तांना आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत म्हाडाकडून ३०० घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्याची पूर्तता अद्याप न झाल्याने माहुल प्रकल्पग्रस्तानी आज (शुक्रवारी) दुपारी ३ वाजता शिवसेना भवनावर मोर्चा नेला जाणार आहे.

माहुल प्रकल्पग्रस्तांचा शिवसेना भवनावर आज धडक मोर्चा

तानसा पाईपलाईनवर झोपड्या बांधून राहणाऱ्या हजारो कुटूंबाना उच्च न्यायालयाच्या आदेशाने विस्थापित करण्यात आले. या बाधितांचे मुंबईत सर्वात प्रदूषण असलेल्या माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आले. माहुलमध्ये रिफायनरी प्रकल्प असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. प्रदूषणामुळे प्रकल्पग्रस्तांना त्वचा रोग, टीबी, कॅन्सर सारखे आजार झाले असून त्यात गेल्या दोन वर्षात १५० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रदूषण असलेल्या माहुलमधून इतर ठिकाणी पुनर्वसन करावे म्हणून ज्या ठिकाणी तानसा पाईपलाईनवरून झोपड्या तोडल्या त्या ठिकाणी ३०० दिवस आंदोलन केले जात आहे. उच्च न्यायालयातही दाद मागण्यात आली. राष्ट्रीय हरित लवादाने माहुलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषण असल्याचा अहवाल दिला. या अहवालानुसार न्यायालयाने राज्य सरकार आणि पालिकेला प्रदूषण नसलेल्या ठिकाणी पुनर्वसन करावे किंवा त्यांना दरमहा भाडे द्यावे असा निर्णय दिला.

माहुल प्रकल्पग्रस्तांचे विद्याविहार येथे आंदोलन सुरू होते त्यावेळी त्याची दखल घेतली जात नसल्याने आझाद मैदानात ५ दिवस आंदोलन केले. या प्रकरणी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन म्हाडाकडून ३०० घरे देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन लवकरच घरे देऊ असे जाहीर केले. मात्र, ही घरे गेल्या ४ ते ५ महिन्यात दिली नसल्याने आज शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details