मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी नंतर महाविकास आघाडी भाजपच्या विरोधात आक्रमक होणार आहे. महाविकास आघाडीच्या मावळ भूमिकेमुळे शरद पवार नेत्यांवर नाराज होते. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपाच्या आरोपांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तिखट शब्दात उत्तर दिलं जाणार आहे.
सीबीआयकडून अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार-
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल (14 एप्रिल) सीबीआयकडून 11 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीचा प्राथमिक अहवाल सीबीआयकडून उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. अहवाल सादर केल्यानंतर भारतीय जनता पक्षा कडून पुन्हा एकदा आरोप लावण्याची शक्यता आहे. मात्र आता भाजपच्या आरोपांना महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून तिखट शब्दात उत्तर देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्यावर भाजपकडून आरोप लावले जात असतांना महाविकास आघाडी कडून घेण्यात आलेल्या मावळ भूमिकेमुळे शरद पवारांनी नाराजी व्यक्त केलं होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपच्या आरोपांना तेवढ्याच प्रखरतेने उत्तर दिलं जाणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला धक्का-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीचा प्राथमिक अहवाल पंधरा दिवसात सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर करावा, असे निर्देशही सीबीआयला उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय चौकशीला बोलवणार हे नक्की झालं होतं. अनिल देशमुख यांच्या चौकशीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या सर्व प्रकरणात भाजपने महाविकास आघाडी सरकारलाच दोषी असल्याचा आरोप केलाय. मात्र आता ही कायदेशीर लढाई माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासहित राज्य सरकारला देखील लढावी लागणार आहे.
तसेच भाजपकडून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील थेट भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आलेले आहेत. सचिन वाझे प्रकरणांमध्ये अनिल परब हे देखील सामील आहेत. असा थेट आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. त्यामुळे अनिल परब यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाजपकडून केली जातेय. मात्र केवळ आरोपांमुळे राजीनामा देणार नाही. तर, आता भाजपला यासंबंधी कायदेशीर उत्तर देऊ, असा इशारा अनिल परब यांनी दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणांमध्ये अनेक चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतील.