मुंबई- महापालिकेची निवडणूक राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकासआघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज येथे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांची एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मलिक यांनी ही माहिती दिली.
मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार - नवाब मलिक
मुंबई महानगरपालिकेत भाजपचे आज असलेले नगरसेवक पुढील निवडणुकीत कमी होतील. कारण ही निवडणूक येत्या काळात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी एकत्र मिळून लडेल आणि भाजपचे सत्तेचे स्वप्न हवेत विरेल, असे नवाब मलिक म्हणाले.
काल (बुधवार) भाजप कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेत भाजपचा झेंडा फडकवला जाणार, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे, त्यांनी अशीच स्वप्ने पाहत रहावे, राज्यातील सत्तेसाठीसुद्धा त्यांनी असे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेत त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही.
मुंबई महानगरपालिकेत भाजपचे आज असलेले नगरसेवक पुढील निवडणुकीत कमी होतील. कारण ही निवडणूक येत्या काळात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी एकत्र मिळून लडेल आणि भाजपचे सत्तेचे स्वप्न हवेत विरेल आणि आज पाहत असलेले स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असेही मलिक म्हणाले.
राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांवर विधानपरिषदेच्या निवडणुकीत जबाबदारी
राज्यात होत असलेल्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांमध्ये उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि संपर्क मंत्र्यांवर देण्यात आली आहे. यासाठी आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेतलेल्या बैठकीत दिले, अशी माहिती नवाब मलिक यांनी या बैठकीनंतर दिली. विधान परिषदेच्या पाचही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी आणि संपर्कमंत्र्यांनी निवडणुका पार होईपर्यंत पूर्ण लक्ष घालावे आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला जिंकून आणावे, असे आदेश आज झालेल्या बैठकीत पवारांनी दिले असल्याचे मलिक यांनी सांगितले.