मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या आणि त्यानंतर या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी मनसुख हिरेन यांचा मृत्यु आणि सचिन वाझेंच्या अटकेमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्य सरकारला लक्ष्य केले जात आहे. तर राज्य सरकारकडून सावध पवित्रा घेतला जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
स्कॉर्पिओ आणि हिरेन प्रकरणी सरकार अडचणीत
स्कॉर्पिओ गाडीचा कार मालक मनसुख हिरेन यांच्या संशयित मृत्युसाठी एनआयएने क्राइम ब्रांचचे एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. त्यामुळे थेट महाविकास आघाडीच्या भूमिकेवरच विरोधकांनी संशय घ्यायला सुरुवात केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळीच सचिन वाझे यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत होते. यासोबतच सचिन वाझे यांचा थेट संबंध शिवसेनेशी असल्याने सत्तेतील मंत्री अथवा नेते सचिन वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला. 2008 मध्ये सचिन वाझे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोविड काळात काम करण्यासाठी काही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्या नियुक्ती मध्ये वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची नियुक्ती झाली. मात्र थेट मनसुख हिरेन हत्या प्रकरण किंवा मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कार प्रकरणात सचिन वाझे हे संशयित म्हणून समोर येत असल्याने विरोधकांकडून शिवसेनेवर गंभीर आरोप सुरू झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांची सावध भूमिका
सचिन वाझे यांचे थेट नाव शिवसेनेशी जोडले गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते सावध भूमिका घेताना दिसत आहेत. या प्रकरणी सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत सचिन वाझे प्रकरणावर सविस्तर चर्चा करत हे प्रकरण लवकरात लवकर सरकार म्हणून कसं मार्गी लागेल याकडे लक्ष देण्यात यावे असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. त्यानंतर शरद पवार यांनी गृहमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत देखील एक बैठक केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रकरणात नेमके काय निर्णय घेतले? आणि त्यांची भूमिकाही तपासली गेली. त्यानंतर लगेचच महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सरकारकडूनही या प्रकरणी भूमिका मांडली गेली पाहिजे अशा प्रकारची चर्चा या बैठकीत झाल्याचे समजते आहे.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट करत सरकारचा बचावसचिन वाझे प्रकरणात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांसमोर येत या प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही असं स्पष्टीकरण दिलं. तसेच सचिन वाझे किंवा कोणतेही अधिकारी या प्रकरणात दोषी असतील तर त्यांच्यावर कायद्यानुसारच कारवाई केली जाईल हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं. तर तिथेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला पश्चाताप करावाच लागेल. अशा प्रकारचा इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री पद इतर कोणाला देण्यासंदर्भात काहीही चर्चा झालेली नसल्याचं स्पष्ट केलं. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देखील योग्य तपास करत आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीचीही कोणतीच चर्चा या बैठकीत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांची प्रतिक्रिया काँग्रेसकडूनही सावध भूमिकामहाविकास आघाडीतील काँग्रेसनेही सचिन वाझे प्रकरणात सावध भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या प्रकरणाचं गांभीर्य सांगत यावर लवकरात लवकर सरकार म्हणून भूमिका स्पष्ट करावी लागेल असं मत मुख्यमंत्र्यांसमोर नाना पटोले यांनी मांडलं. तसंच सचिन वाझे प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्या कोणालाही महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालणार नाही असं स्पष्ट केलं. तसंच केंद्र सरकारवर पुन्हा एकदा नाना पटोलेंनी हल्ला चढवत केंद्र सरकार तसेच महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते सातत्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. पोलीस खलनायक असल्याचे चित्र उभं करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे. नाना पटोलेंची प्रतिक्रिया सचिन वाझे यांच्याशी शिवसेनेचा काही संबंध नाही- अनिल परबसचिन वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्याने हाच मुद्दा विरोधकांनी उचलून धरलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरण असेल किंवा मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली संशयित कार प्रकरण असेल, या प्रकरणाचा थेट संबंध शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. मात्र सचिन वाझे यांच्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. विरोधकांकडे सचिन वाझे यांच्या संदर्भातील काही पुरावे असतील तर घ्यावेत असा अनिल परब यांनी विरोधकांना सल्ला दिलाय. 2008 मध्ये सचिन वाझे यांनी जरी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी, त्यानंतर ते कधी शिवसेनेत सक्रिय राहिले नाही. त्यांनी कधीही आपली सदस्य नोंदणी करून घेतली नाही. अशा प्रकारचे स्पष्टीकरण अनिल परब यांच्याकडून देण्यात आले आहे. सत्ताधारी सावध भूमिकेत
एकूणच काय तर, सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढताना दिसतेय. म्हणूनच जवळपास पंधरा ते सोळा दिवसांनंतर महाविकास आघाडीचे नेते या प्रकरणात आपली सावध भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडण्यासाठी समोर येत आहेत. मात्र केवळ सचिन वाझे या प्रकरणामुळे महाविकास आघाडीला सावध भूमिका घ्यावी लागली नाही तर, संजय राठोड प्रकरण आणि धनंजय मुंडे प्रकरणातही महाविकास आघाडीच्या नेत्यांना बैठका घेऊन त्याबद्दलची रणनीती आखावी लागली होती.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी कोंडीत
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे थेट नाव विरोधकांकडून जोडल गेल्याने महाविकासआघाडी कोंडीत सापडली होती. संजय राठोड यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी विरोधकांनी केली होती. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही. अशा प्रकारचा इशारा विरोधकांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात यावा असा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसून आला होता. त्यामुळेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी संजय राठोड यांना मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला. राजीनाम्यानंतर हे प्रकरण शांत झाले. मात्र या प्रकरणातही शिवसेनेसह महाविकास आघाडी कोंडीत सापडल्यास चित्र पाहायला मिळालं.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप
धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या बहिणीने बलात्काराचे आरोप लावल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या मुद्द्यावरून देखील विरोधकांनी महाविकास आघाडीला धारेवर धरलं होतं. सत्तेत असलेल्या या मंत्र्यांवर अशाप्रकारचे गंभीर आरोप होत असतील तर, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. अशा प्रकारची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी पीडित तरुणीने आपली तक्रार मागे घेतल्यानंतर हे प्रकरण काहीच शांत झालं होतं. पण त्यानंतर लगेचच धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांच्यावर मारहाणी सारखे गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दिली होती. त्यामुळे धनंजय मुंडे हे प्रकरण अगदी संयमाने महाविकास आघाडीला हाताळावे लागले होते. मात्र या प्रकरणात देखील महाविकास आघाडीच्या छवीला कुठेतरी छेद हा नक्कीच गेला होता.
हेही वाचा -महाविकास आघाडीविरोधात भाजपचे सोशल वॉर! गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी