मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिव्यांग व्यक्तींसाठी महाशरद नावाचे पोर्टल आणि विविध योजनांच्या माहितीसाठी पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून ई-बार्टी नावाचे ॲप लाँच केले जाणार आहे. यासाठीची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शरद पवार यांचा उद्या (१२ डिसेंबर) ८० वा वाढदिवस असून, त्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने महाशरद पोर्टल आणि ई-बार्टी ॲप सुरू केले जाणार असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.
दिव्यांग व्यक्तीसाठी महाशरद हा डिजीटल प्लॅटफार्म योजना सुरू केले जाणार आहे. राज्यात दिव्यांगांचे २१ प्रकार नमूद केले असून त्यांना विविध प्रकारचे साहित्य, यंत्रणा, उपकरणे उपलब्ध करून दिल्यास माणूस म्हणून जगण्यास अधिक मदत मिळणार आहे. यामुळे त्यांना विविध प्रकारची ३० उपकरणे उपलब्ध आहेत, ती गरजूंना उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे मुंडे यांनी सांगितले. दिव्यांग व्यक्ती आणि दाते यांना जोडण्याचे आम्ही काम महाशरद हा डिजीटल प्लॅटफार्मच्या माध्यमातून करणार आहोत.
मार्चनंतर ॲपची होणार सुरूवात
सध्या हे वेबबेस पोर्टल असून मार्च २१ नंतर हे ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. तर महाशरद हे पोर्टल उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सुरू केले जाणार आहे. दिव्यांग व्यक्ती यावर आपली नोंदणी करतील, दानशूरही आपली नोंद करून ते आपली मदत उपलब्ध करून देतील. यात संस्था, उद्योग यांना जोडण्यासाठी आम्ही चर्चा केली असल्याची माहितीही मुंडे यांनी यावेळी दिली.