मुंबई -महाराष्ट्राच्या सहाव्या विधानसभेसाठी व २८८ जागांसाठी २१ मे १९८० रोजी मतदान झाले. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर इंदिरा गांधींनी देशातील ९ काँग्रेसतर सरकारांसोबत महाराष्ट्रातील शरद पवारांच्या नेतृत्वातील पुलोद सरकार बरखास्त केले व मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली. या निवडणुकीनंतर राज्यात पहिल्यांदाच मुस्लीम नेत्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले. सहाव्या विधानसभेत शरद दिघे सभापती होते. पाच वर्षात तीन मुख्यमंत्री तर सादीक अली, ओ.पी.मेहरा व आय.एच. लतिफ असे राज्यपाल महाराष्ट्राने पाहिले.
१९७९ मध्ये मध्यावधी लोकसभा निवडणुका होऊन इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. त्यावेळी महाराष्ट्रासह ९ राज्यात बिगर काँग्रेसी सरकार जनता पक्षाच्या काळात सत्तेवर आली होती. इंदिरा गांधींनी सत्ता मिळवताच १७ फेब्रवारी १९८० रोजी सर्व सरकारे बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली. महाराष्ट्रात प्रथमच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. १६ फेब्रुवारी रोजी शरद पवारांना सत्तात्याग करावा लागला व दुसऱ्या दिवशीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ८ जूनपर्यंत म्हणजे सुमारे चार महिने राष्ट्रपती राजवट सुरू होती. दरम्यान इंदिरा गांधींनी महाराष्ट्राची मध्यावधी निवडणूक जाहीर केली.
हे ही वाचा - MAHA VIDHAN SABHA : पवारांचा 'तो' प्रसिद्ध खंजीर.. राज्यातील पहिले आघाडी सरकार व सर्वात तरुण मुख्यमंत्री
महाराष्ट्राची सहावी विधानसभा निवडणूक -
महाराष्ट्राच्या सहाव्या विधानसभेवेळी म्हणजे १९८० मध्ये नोंदणीकृत मतदारांची संख्या ३ कोटी ३७ लाख ६८ हजार १०६ इतकी होती. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ कोटी ७२ लाख ५७ हजार ३५४ तर महिला मतदारांची संख्या होती १ कोटी ६४ लाख १५ हजार ८२१. त्यापैकी ५३.३० टक्के म्हणजे १ कोटी, ७९ लाख ४६ हजार ३७२ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. २८८ जागांसाठी एकूण १५३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी महिला उमेदवारांची संख्या होती ४७ त्यापैकी १९ महिला उमेदवार आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या. या निवडणुकीत ८८६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.
१९७२ च्या निवडणुकीत एकूण २८८ पैकी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांची संख्या होती २४८ त्यानंतर अनुसुचित जाती १८व अनुसुचित जमाती प्रवर्गातून २२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ३ लाख ९७ हजार ७१७ मते बाद ठरविण्यात आली याची टक्केवारी २.२२ टक्के इतकी होती. ही निवडणूक घेण्यासाठी ४०,४१९ मतदान केंद्रे उघडण्यात आली होती.
हे ही वाचा -MAHA VIDHAN SABHA : एकही महिला आमदार न झालेली निवडणूक.. शिवसेनेचा चंचूप्रवेश व सहकार चळवळीचा पाया
या निवडणुकीत २८८ पैकी तब्बल १८६ जागा जिंकून काँग्रेसने राज्यातील सत्ता पुन्हा मिळवली. काँग्रेसने मिळवलेल्या मतांची टक्केवारी ४४.५० टक्के इतकी होती. मागील निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा जनता पक्ष यावेळी कसाबसा १७ मतदारसंघात विजयी झाला. त्यांना ५.९० टक्के मते मिळाली. रेड्डी काँग्रेसला १६ .३१ टक्के मते मिळाली तर ४७ जागा निवडून आल्या. त्यानंतर भाजपला १४, शेकापला ०९, कम्युनिस्ट ४ तर १० अपक्ष उमेदवारही निवडून आले.
महाराष्ट्राचा पहिलाच मुस्लीम मुख्यमंत्री -
१९७५ मध्ये आणीबाणी लागू झाली व आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला व जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून जनता पक्षात प्रवेश केला. ब्रम्हानंद रेड्डी व यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांनीही इंदिराजींची साथ सोडली. या कठीण परिस्थितीत इंदिरा गांधींना मोलाची साथ दिली तसेच संसदेत इंदिराजींच्या बाजुने आवाज उठवला असे तीनच नेते होते. ते म्हणजे अब्दुल रेहमान अंतुले, वसंत साठे व केरळचे नेते स्टीफन
पुन्हा सत्तेत परतताच इंदिरा गांधींनी त्यांना योग्य पुरस्कार देऊन त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ दिले. अंतुलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, वसंत साठेंना केंद्रात नभोवाणी व प्रसारण मंत्रालयाचा कारभार तर स्टीफन यांनाही केंद्रात मोठे पद दिले.
हे ही वाचा -MAHA VIDHAN SABHA : शरद पवारांची पहिली निवडणूक.. विक्रमी विजय अन् काँग्रेसचे विभाजन
८ जून १९८० रोजी काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी अब्दूल रेहमान अंतुले म्हणजे बॅरिस्टर अंतुले यांची निवड झाली. विशेष म्हणजे जेव्हा त्यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली त्यावेळी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. ९ जून १९८० रोजी राज्यपाल सादीक अली यांच्याकडून अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुढे २३ नोव्हेंबर १९८० रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत अंतुले विजयी झाले व ते विधानसभेचे सदस्य झाले.
राज्यपाल व मुख्यमंत्री दोन्ही मुस्लीम -
१९८० मध्ये बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री ठरले. योगायोग म्हणजे त्यावेळी राज्याच्या राज्यपालपदीही एक मुस्लीम व्यक्ती सादीक अली होते. त्यांनीच अंतुलेंना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
अब्दुल रहेमान अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ मध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील आंबे येथे झाला. अंतुले व्यवसासाने वकील होते व त्याने कायद्याची पदवी लंडनमधून मिळवली होती. अंतुलेंच्या निवडीने जसा महाराष्ट्राला धक्का तसेच याबद्दल देशभरातून आश्चर्य व्यक्त केले गेले. अंतुलेंसाठीही हा सुखद धक्का होता.
हे ही वाचा -MAHA VIDHAN SABHA : स्वतंत्र महाराष्ट्राची पहिली निवडणूक.. तीन मुख्यमंत्री अन् शिवसेनेचा उदय
याआधी १९७२ च्या नाईक मंत्रिमंडळात अंतुले राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे दळणवळण व मत्सव्यवसाय ही खाती होती.
अंतुले मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय -
- अंतुले मुस्लीम असले तरी शिवाजी महाराजांवर त्यांची असीम भक्ती होती. सत्तेवर येताच त्यांनी लंडनमधील भवानी मातेची तलवार परत आणण्याची घोषणा केली.
- प्रत्येक तालुक्यात हुतात्मा स्मारक उभारण्याची व त्यावर हुतात्म्यांची नावे कोरण्याची घोषणा केली.
- शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड असे ठेवले.
- रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तर औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करून जालना या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. उस्मानाबादचे विभाजन करून लातूरची निर्मिती करण्यात आली.
- राज्य पोलीस दलातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या गणवेशात हाफ पँच काढून फुलपँटचा समावेश.
महत्वाचे प्रकल्प व योजना -
- कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानची स्थापना. याच प्रतिष्ठानमुळे अंतुलेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.
- अंतुलेंना राज्यातील ७ लाख ८० हजार शेतकऱ्यांची सुमारे ४९ कोटींची कर्जमाफी केली. देशातील ही पहिलीच शेतकरी कर्जमाफी होती. याबाबत अंतुले व आरबीआयमध्ये वाद झाला. परंतु अंतुले आपल्या निर्णयावर कायम राहिले.
- सांगितले जाते की, लातुरमधील एका निराधाराला महिना केवळ १ रुपया पेन्शन असल्यामुळे त्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत नव्हता. अंतुलेंना ही गोष्ट माहीत होताच त्यांनी कमीत-कमी पेन्शन ६० रुपया करण्याचा निर्णय घेतला.
- चार लघुबंदराच्या विकासाची योजना, मानखुर्द-नवी मुंबई रेल्वे प्रकल्प.