मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत शिंदे गटाचा दबदबा निर्माण झाला आहे. ठाणे, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई शहरातून शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जातो आहे. मात्र आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला अधिकृत मान्यता न मिळाल्यास, इच्छुकांना निवडणूक काळात उमेदवारी अर्ज भरताना बंडखोरांच्या समर्थन करणे डोकेदुखी ठरणार आहे.
शिंदेंनी पक्षप्रमुखाला खेचले सत्तेवरून खाली -शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री असूनही भेट दिली जात नाही. विकास कामाच्या निधीची बोंब आहे. परिणामी मतदार संघातील कामे रखडली आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना पक्ष संपवण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. ५० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv sena chief Uddhav Thackeray ) यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले. आणि भाजपसोबत शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंडी -मुख्यमंत्री शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आमच्याकडे असून खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा केला. तसेच शिवसेना पक्ष आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह ( Shiv sena Sign Bow and Arrow ) ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यापूर्वीच शिंदे यांची हकालपट्टी ( Eknath Shinde Expulsed from Shiv sena ) करत त्यांना दणका दिला. शिवसेनेतील त्यांचे अस्तित्व संपले आहे. अशातच शिवसेनेतून शिंदे गटाला समर्थन देणारे ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली भागातील अनेक लोकप्रतिनिधी शिंदे गटाकडे वळले आहेत. मुख्यमंत्री शिंदेना पाठिंबा दिलेल्या या लोकप्रतिनिधींची आता आगामी निवडणुकीत कोंडी होण्याची शक्यता आहे.
पक्ष आणि चिन्हावर वर्चस्व सोपे नाही -प्रत्येक राजकिय पक्षाला चालवण्यासाठी काही नियमानुसार स्वतंत्र घटना आहे. त्या घटनेनुसार आणि घटनेतील नियमांनुसार पक्ष चालत असतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९७६ मध्ये शिवसेनेची घटना तयार केली. १३ सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारणी समिती कार्यकारणी ठरवून सर्वोच्च पद शिवसेनाप्रमुखांकडे राहील, अशी नियमावली तयार केली. निवडणूक आयोगाने शिवसेनेला राज्यस्तरीय पक्षाची मान्यता देत १९८९ ला धनुष्यबाण चिन्ह दिले. याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर वर्चस्व मिळवणे, यामुळे सहजासहजी सोपे नाही.